पुणे : बिबट्याने साडेतीन वर्षाच्या चिमुकल्‍याची मान पकडली; मुलगा गंभीर जखमी | पुढारी

पुणे : बिबट्याने साडेतीन वर्षाच्या चिमुकल्‍याची मान पकडली; मुलगा गंभीर जखमी

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा रेटवडी (ता. खेड) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. मुलाला जबड्यात धरून पळून जात असताना गावकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून धूम ठोकली. मात्र हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेटवडीच्या जरेवस्ती येथे शुक्रवारी (दि .1) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, साईश दत्तात्रय पवळे हा साडेतीन वर्षाचा मुलगा रात्री घराबाहेर खेळत होता. तसेच घरातील सर्वजण अंगणात जेवण करित होते. घराच्या बाजूने अंधारातून अचानक बिबट्या आला. त्याने अंगणात येऊन चिमुकल्याची मान पकडली. उपस्थितांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने चिमुकल्याला सोडून धुम ठोकली. या हल्ल्यात चिमुकला रक्तबंबाळ झाला. या बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या साईशच्या मानेला २२ टाके पडले असून, पाठीला पंज्याने ओरखडले आहे. साईशची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. हर्षद गावडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, बिबट्या कधी येईल आणि कधीही हल्ला करेल याचा नेम नसल्याचे माजी सरपंच दिलिप पवळे यांनी सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले आहेत. खेडमध्ये विविध भागात असे हल्ले होत असल्याने तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Back to top button