हिंगोली : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणे पडले महागात | पुढारी

हिंगोली : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणे पडले महागात

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीमधील वसमत येथे चार महिन्यापूर्वी कुटुंबीयांनी बालविवाह लावल्यानंतर पीडित मुलीने थेट स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे लग्न करणाऱ्या तरूणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वसमत येथील एका १७ वर्षीय मुलीचा डिसेंबर २०१९ मध्ये अर्धापूर (जि. नांदेड) येथील प्रसाद राऊत नावाच्या तरुणासोबत विवाह झाला. त्यानंतर तीन महिने मुलगी सासरी होती. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरील मुलगी अकोला येथील रेल्वे स्थानकावर आढळून आली. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी तिची चौकशी करून तिला बालगृहात पाठवले. यावेळी बालगृहाच्या समितीने त्या मुलीची सखोल चौकशी केली. या चौकशीमध्ये त्या मुलीने तिचा बालविवाह लावण्यात आल्याचे चौकशीत नमूद केले. तसेच तिच्या पतीने अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही शरीरसंबंध ठेवल्याचेही चौकशीत सांगितले.

त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून अकोला लोहमार्ग पोलिस ठाण्यात मुलीच्या आई-वडिलांना सोबतच पती प्रसाद राऊत, सासरा गोविंद राऊत यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून प्रसाद राऊत यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वसमत पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडल्यामुळे हा गुन्हा अकोला लोहमार्ग पोलीस ठाण्यातून वसमत शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पीडित मुलीची भेट घेतली जाणार असून सदर मुलगी अर्धापूर येथून अकोला येथे गेली कशी ? याची माहितीही घेतली जाणार असल्याचे पोलिसातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button