नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगभरातील सध्याच्या भौगोलिक, राजकीय परिस्थितीमुळे सर्वच खाद्यतेलांचे दर वधारले आहेत. सोयाबीन तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत गेल्या महिन्याभरात ५.०५ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात सोयाबीन तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमत ४२.२२ टक्क्यांनी वधाारली आहे. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यावरील दबावाचा परिणाम इंडोनेशियाच्या निर्यात धोरणावर तसेच पाम तेलाच्या आयातीवर झाला आहे. शिवाय दक्षिण अमेरिकेतील पिकांच्या नुकसानीमुळे सोयाबीन तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार व अन्न-नागरी पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
खाद्यतेलाच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी केंद्राने ३० मार्च २०२२ रोजी परवाना आवश्यकता, साठवणूक मर्यादा आणि विशिष्ट खाद्यपदार्थ आदेश २०१६ तसेच ३ फेब्रुवारी २०२२ रोजी काढलेल्या केंद्रीय आदेशांमधील निर्बंधांमध्ये दुरुस्ती करणारा केंद्रीय आदेश अधिसूचित केला आहे. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्व खाद्यतेल आणि तेलबियांची साठवणूक मर्यादा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आज, शुक्रवारपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
खाद्यतेलाची साठवणूक मर्यादा किरकोळ विक्रेत्यांसाठी ३० क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी ५०० क्विंटल, मोठ्या ग्राहकांच्या म्हणजेच मोठे साखळी विक्रेते आणि दुकाने यासारख्या किरकोळ दुकानांसाठी ३० क्विंटल आणि त्यांच्या डेपोसाठी १००० क्विंटल असेल. खाद्यतेलाचे प्रोसेसर त्यांच्या साठवण, उत्पादन क्षमतेच्या ९० दिवसांचा साठा करू शकतील, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर, खाद्य तेलबियांसाठी साठवणूक मर्यादा किरकोळ विक्रेत्यांसाठी १०० क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी २००० क्विंटल असेल. यापूर्वी, सरकारने ३ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या आदेशानुसार खाद्यतेले आणि तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जून २०२२ पर्यंत मर्यादा लागू केली होती.
हेही वाचलंत का ?