युद्धाच्या नावाखाली भाववाढ : सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडलं

महागाईने मोडले कंबरडे. पैसाच राहिना शिल्‍लक; आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ
महागाईने मोडले कंबरडे. पैसाच राहिना शिल्‍लक; आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ

बीड (गजानन चौकटे) : किराणा बाजारात खाद्यतेल, गहू, रवा, शेंगदाणा, मैद्याचे दर (Inflation) वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट चांगलंच कोलमडल्याचे चित्र सध्या गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्याने अन्नधान्यासह खाद्य तेलाचे दर भडकले असून युद्धाची ही स्थिती कायम राहिल्यास आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आली आहे. रशिया गव्हाचा मोठा उत्पादक देश असून यामुळे गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या भावात वाढ झाली.

सरकारने रशियासह ७ देशांना ७० लाख टन गहू निर्यात करण्यास मंजुरी दिल्याने किरकोळ बाजारात गव्हाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रवा मैद्याचे भाव वाढले खाद्यतेलाचे भाव किलोमागे ३५ रुपयांनी वधारले आहेत. तर रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम दाखवत अनेक व्यापाऱ्यांनी साहित्य दर वाढवले आहेत. व्यावसायिकांकडून जुन्या दारात आणलेलं तेल नवीन दरात विक्री करण्यात येत आहे.

या आधी कोरोना काळात प्रचंड भाववाढ (Inflation) झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर भाववाढ कमी झाली. मात्र, गत एक ते दोन महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता एक नवीन कारण सुरू झालं, ते म्हणजे युद्धाच. त्याचं कारण पुढे करत अनेकांनी मोठी भाव वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा डंख सोसत जीवन जगावे लागत आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो सामान्य नागरिकांची महागाई विरुद्धची लढाई ही कायम सुरू असते. कधी उत्पादन कमी, कधी मागणी जास्त, कधी कोरोना, कधी बजेट, तर कधी युद्ध. कारण कोणतेही असो मागणी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे, मात्र कठीण झाले आहे. तिकडे हाताला काम नाही तर दुसरीकडे महागाईचा फटका बसत आहे. त्यामुळे आता जगायचं कसं ? तुम्हीच सांगा, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे उभा टाकला आहे. खाद्य पदार्थांच्या किमतीपासून घराच्या बांधकामापर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे भाव सध्या स्थिर असले तरी आगामी काही दिवसांत वाढण्याची भीती आहे. खाद्यतेलाच्या किमतीमुळे खाद्यपदार्थांच्या दरांनी उच्चांक (Inflation) मोडला आहे.

गहू का महागला ?

रशिया युक्रेन युद्धामुळे रशियातून भारतासह अन्य देशात येणारा गहू बंद झाल्याने भारत सरकारने ७० लाख टन गव्हाच्या निर्यातीला मंजुरी दिल्याने गहू चांगलाच महागला.

युक्रेनचे सूर्यफूल, मलेशियाचे पामतेल बंद

युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कमालीची अस्थिरता निर्माण झाली असून युक्रेनचे सूर्यफूल तेल आणि मलेशियातील पामतेल बंद झाले आहे. परिणामी, खाद्यतेलाच्या किंमतीत भाववाढ झाली आहे.

युद्धाच्या नावावर छोटे मोठे व्यवसायिक चढ्या दराने मालाची विक्री करीत असल्याचे दिसून येते हल्ली महागाईचा भडका चांगलाच उडला आहे. यामुळे किचनच्या बजेटची पूर्ती वाट लागली आहे.
सुरेखा सुलाखे – पाठक (गृहिणी)

खाद्यतेल, अन्नधान्यासह भाजीपाला , किराणासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दुप्पटीने भाववाढ झाली . या वस्तूचे दर सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे जीवन जगत असताना अडचणीत वाढ होते .
अंजली शिंदे (गृहिणी)

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : भविष्यात आप हा देशातील मोठा विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो का? राजकीय विश्लेषक संतोष कुलकर्णी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news