Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणाले, “तुम्‍ही पहिलवान तर…”

Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणाले, “तुम्‍ही पहिलवान तर…”

लासलगाव (वार्ताहर ) : पाचपैकी चार राज्यांच्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी  या पक्षाचा आत्मविश्वास वाढला असेल; मुंबई मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे. तुम्ही पहिलवान असाल तरी, आम्हीही पहिलवान आहोत, अशा शब्‍दात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी  भाजपवर टीका केली.

शिवसेनेने आता मुंबई महानगरपालिका विसरून जावे, असे विधान भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याबाबत बाेलताना गुलाबराव पाटील म्‍हणाले, "पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश  मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महापालिकेची  मागील निवडणूक शिवसेनेने स्‍वबळावर लढवली आणि जिंकलीही. आता चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी, जरी तुम्हीही पहिलवान असाल तरी, आम्हीही पहिलवान आहोत".

पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेचे लव मॅरेज-Gulabrao Patil

 मुंबई ही मराठी माणसाची आणि शिवसेनेची आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते तर काय परिस्थिती असती, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे.  हे पाच वर्ष सोडले तर पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेचे लव मॅरेज होते, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

राजकारणी माणसाने 'या चार' लोकांशी नातं ठेवले पाहिजे

लासलगाव येथील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर बोलताना गुलाबराव पाटील म्‍हणाले, " डॉक्टर आणि राजकारणी लोकांमध्ये जास्त फरक नसताे. दोघेही जनरल फिजिशन असतात. राजकारणी माणसाने चार लोकांशी नातं ठेवले पाहिजे पहिले शेतकरी, दुसरे पोलीस, तिसरे व्यापारी, आणि चौथे डॉक्टर. हीच नाती राजकारणी लोकांची 'ब्लड बँक' आहे. पोलिसांना फोन करून एक मोटरसायकल सोडल्यास दोन मते पक्की होतात. डॉक्टरांना फोन करून बिल कमी केले तर दहा मते पक्की होतात. एका शेतकऱ्याची विजेची लाईन जोडून दिली तर ५० मते मिळतात. व्यापार्‍याला त्रास नाही दिला तर व्यापारी पुड्या बांधत  शंभर मते पक्की करतो ."

एकेकाळी मी पान टपरी आणि व्हिडिओ चालवणारा चालक

 राजकारणी माणसांची सुरूवात वेगवेगळ्या परिस्थितीतून होते. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांचे डॉक्टर असतात त्याचप्रमाणे आमचे पक्षही वेगवेगळी असली तरीही, माणसांची कार्य करणारी भावनाही आहे. मी एका शेतकरी कुटुंबातील असून, कधीही आमदार होण्याचे स्वप्न बघितले नाही. माझ्या कुटुंबातील कधीही  ग्रामपंचायत सदस्यही नव्हता. मी १९८२ साली पान टपरी आणि व्हिडिओ चालवणारा चालक होतो. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आज मंत्री पदापर्यंत पोहचल्याचे त्यांनी  सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ : पंजाब निकालाचे विशेष न्यूज बुलेटीन | special news Bulletin

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news