यवतमाळ : दातोडी येथील डॉ. जयप्रकाश मुजमुले अपघातात ठार | पुढारी

यवतमाळ : दातोडी येथील डॉ. जयप्रकाश मुजमुले अपघातात ठार

घाटंजी (जि. यवतमाळ), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुर्ली येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. जयप्रकाश विठ्ठल मुजमुले (रा. दातोडी, वय ४०) हे चिखलवर्धा ते कुर्ली दरम्यान मोटार सायकलने येताना वन विभागाच्या जंगलात अपघातात ठार झाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, डॉ. जयप्रकाश मुजमुले हे सावळी (सदोबा) ते कुर्ली दरम्यान दररोज वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी मोटार सायकलने ये- जा करत असतात. मुजमुले हे गुरुवारी (दि.३) रोजी आपल्या दुचाकीने चिखलवर्धा – कुर्ली मार्गावरुन कुर्ली येथे येत होते. याच दरम्यान त्याचा वन विभागाच्या जंगलात अपघात झाला. थोड्या वेळाने डॉ. जयप्रकाश मुजमुले हे जंगलात रस्त्याच्या बाजूला पडून असल्याचे लोकांना निदर्शनास आले.

यानंतर चिखलवर्धा येथील नागरिकांनी मुजमुले यांना अॅटो रिक्षाने कुर्ली येथे आणले. प्रकृती गंभीर असल्याने अगोदर डॉ. शैलेश यादव (यवतमाळ) यांच्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. प्रकृती आणखी चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील क्रिटीकेअर दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. मुजमुले यांचा मृत्यू झाला. मृत्युनंतर त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी नंदीनीसह मोठा आप्त परिवार आहे.

सदर प्रकरणात पारवा पोलीस ठाण्यात अद्यापही कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. पंरतु, मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने डॉ. मुजमुले यांच्या दुचाकीला धडक दिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button