Hingoli : नगरपरिषदेकडून प्लास्टिकपासून पॅलेट्स तर कापडापासून दोऱ्यांची निर्मिती | पुढारी

Hingoli : नगरपरिषदेकडून प्लास्टिकपासून पॅलेट्स तर कापडापासून दोऱ्यांची निर्मिती

हिंगोली पुढारी वृत्तसेवा :  नगरपरिषदेकडून शहरातून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे करण्यात आले आहे. प्लास्टिकपासून पॅलेट्स निर्मिती करण्यात येणार आहे. या पॅलेट्सची कारखान्यांना विक्री करण्यात येणार  आहे. कचऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या कापडापासून दोरी निर्मितीचा प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये हा प्रकल्प कार्यरत होणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्यधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.

नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये यापूर्वी कचरा वर्गीकरण यंत्र बसविण्यात आले आहे.  यंत्राद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण होत असून खत देखील उपलब्ध होत आहे.  खत हे उच्च प्रतीचे असल्यामुळे त्याला मागणी देखील वाढू लागली आहे. नगरपरिषदेच्या वतीने  खत विक्रीदेखील केले जात आहे. कचरा व्यवस्थापनामधून उपलब्ध प्लास्टिक प्रकार यापूर्वी गठ्ठे स्वरूपात बांधून कारखान्यांना विकल्या जात होता; परंतु आता या प्लास्टिक वर थेट घनकचरा व्यवस्थापन केंद्रांमध्ये प्रक्रिया करण्यात येणार आहे. याद्वारे प्लास्टिक पॅलेट्स तयार करण्यात येणार आहेत. (Hingoli)

पेलेट्स विविध कारखान्यांमध्ये बॉयलर करिता उपयोगी पडत असतात. थेट पॅलेट्स विक्री केल्यानंतर याचा नगरपरिषदेला अधिक फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त कचऱ्यामधून जे कापड उपलब्ध होत आहे. त्या कापडावर प्रक्रिया करण्यासाठी दोरी निर्मिती केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. टाकाऊपासून टीकाऊ उद्देशाने निर्माण होणाऱ्या दोर्‍या स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे देखील पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. याव्यतिरिक्त घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरामध्ये अटल घनवट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यापूर्वी पालिकेच्यावतीने या परिसरात सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे योग्य संगोपन देखील केल्या जात आहे. या पाठोपाठ आता अटल धनवन प्रकल्प वरून परिसराचा कायापालट केल्या जाणार आहे, असेही डॉ अजय कुरुवाडे यांनी सांगितले. (Hingoli)

हेही वाचलत का?

Back to top button