

पुढारी ऑनलाईन डेस्क :
शिवसेनेचे नेते संजय राऊत हे रोज सकाळी बोलून सर्वांचे मनोरंजन करतात. त्यांच्या विधानांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत सिंह गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही, असा पलटवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
या वेळी फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने कोणावरही अन्यायकारक कारवाई केलेली नाही. संजय राऊत दररोज सकाळी बोलून सर्वांचे मनोरंजन करत असतात. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ते बोलतात. नेमके कोणते विधान केली की, बातमी होते याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी ते बोलत असतात. अशा विधानांना आम्ही महत्व देत नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यास नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून ( 'ईडी' ) शिवसेनेचे नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना टार्गेट केले जात आहे, अशी तक्रार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. तसेच यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, ईडीसारखी तपास यंत्रणा राजकीय धन्याची बाहुली बनली आहे. माझ्या मुलीच्या लग्नातील फुलांची सजावट करण्यांची ईडीने चौकशी केली. त्यांना विचारले किती पैसे मिळाले, डेकोरेशन करणार्याची चौकशी करणे हे ईडीचे काम आहे का, असा सवाल करत आता मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर पत्रकार परिषद घेत ईडीला बेनकाब करणार असल्याचा इशारा आज संजय राऊत यांनी दिला होता.
हेही वाचलं का?