हिंगोली : मंडळ अधिकाऱ्यास 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

हिंगोली : मंडळ अधिकाऱ्यास 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीत वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ८) सायंकाळी रंगेहाथ पकडले. श्रीकांत कोंडबा मदीलवार असे मंडळ अधिकाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.​​​

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील काही वाळूघाटामधून सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. या बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळू उपसा वाहतुक होते. वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल न करण्यासाठी मंडळ अधिकारी मदीलवार यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली.  मात्र तक्रारदाराने सदर रक्कम देण्यास नकार दर्शविला असता 20 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. सदर रक्कमेपैकी 10 हजार रुपयांची रक्कम आज देण्याचे ठरले होते.

मात्र, संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर लाचलुचपतचे उपाधिक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युनुस सिद्दीकी, जमादार विजय उपरे, रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजाराम फुफाटे, सुजीत देशमुख, हिंमतराव सरनाईक, महिला पोलिस कर्मचारी योगिता अवचार यांच्या पथकाने हिंगोली शहरातील सीटीक्लब भागात सापळा रचला होता.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे मदिलवार यांनी 10 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराकडून स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

हे ही वाचलं का  

Back to top button