

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात यावे यासाठी मार्चा, निवेदनांद्वारे शासनाचे लक्ष वेधले जाईल. प्रशासकीय पातळीवर प्रयत्नांसोबत वेळ पडल्यास उपोषणाचाही मार्ग स्वीकारू, असा इशारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके यांनी दिला. शुक्रवारी (दि. 26) सहा जिल्ह्यांतील वकिलांची बैठक होणार असून, यामध्ये अंतिम निर्णय होणार आहे.
खंडपीठ आंदोलनाबाबत बुधवारी दुपारी जिल्ह्यातील वकिलांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष अॅड. खडके बोलत होते. बैठकीत ज्येष्ठ विधिज्ञ व सदस्यांनी आपल्या सूचना व मते मांडली. बहुतांशी वकिलांनी खंडपीठासाठी प्रखरपणे आंदोलन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
चक्री उपोषण करणे, आमरण उपोषण करणे, मोर्चे काढून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणे, सहा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणे तसेच पंतप्रधान व गृहमंत्र्यांची भेट घेऊन खंडपीठाच्या आवश्यकतेची माहिती देणे, आरक्षित जागेबाबत महसूलमंत्र्यांची भेट घेणे, या सर्व सूचना शुक्रवारी सहा जिल्ह्यांतील खंडपीठ कृती समितीसमोर मांडल्या जातील, अशी ग्वाही अॅड. खडके यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे, अॅड. महादेवराव आडगुळे, धनंजय पठाडे, प्रकाश मोरे, संपतराव पवार, अशोक पाटील, रणजित गावडे, अजित मोहिते यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव विजयकुमार ताटे-देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.