कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वाघझीरा व खिरोदा या गावात विंचवाची नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. नवीन प्रजाती ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी ही कामगिरी केली.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आढळलेल्या या प्रजातीचे नामकरण 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस'(Compsobuthus satpuraensis) असे केले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या 50 प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे.
संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापूर) आणि अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा सहभाग आहे.
असा आहे विंचू…
विंचवाचा रंग, शेपटीवरील वैशिष्ट्यपूर्ण दानेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. सुमारे वर्षभर यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले.
सत्पाल गंगलमाले अक्षय खांडेकर विवेक वाघे.