‘मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा’

आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा www.pudhari.news
आंदोलन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा www.pudhari.news

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील मंत्रालय आवारात ईडी विरोधात आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार दक्षिण मुंबईत आंदोलन करण्यास बंदी असून मंत्रालय परिसराचा समावेश शांतता क्षेत्रात होतो. त्यामुळे शांतता क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशाला फाटा देत आंदोलन करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला एक न्याय आणि मंत्र्यांना दुसरा न्याय, अशा प्रकारचा भेदभाव होता कामा नये. कायदा सर्वांना समान आहे. शांतता क्षेत्र असूनही २४ फेब्रुवारीला महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवरून ईडी विरोधात मंत्रालय आवारात तीव्र आंदोलन केले.

महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनाची कुठल्याही पक्षाने किंवा मंत्र्यांनी पोलीस परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पदाचा गैरवापर करणाऱ्या मंत्र्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. मंत्रालयातील आंदोलनकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीचे मंत्री सुभाष देसाई यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांसह काही मंत्री व आमदारांचा समावेश होता. मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ पोलीस परवानगी न घेता आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

सरकारमधील सर्व पक्षांनी आपापले वर्चस्व राखण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन केल्याचा पाटील यांचा आरोप आहे. कायदेशीर मार्गाने कारवाई होत असताना पक्षांनी शक्ती प्रदर्शन केल्यास कायद्याने कारवाई करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि मरीन लाईन्स पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news