Wheat crop : हवेवरच्या गव्हाचे संशोधन करून सुधारित वाण करणार | पुढारी

Wheat crop : हवेवरच्या गव्हाचे संशोधन करून सुधारित वाण करणार

विटा; विजय लाळे : हवेवरच्या गहू पिकाचे ( Wheat crop ) अधिकचे संशोधन करून सुधारित वाण विकसित करण्याचा आमचा मानस असल्याची माहिती राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या महाबळेश्वर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुशील मनीष गेरवा यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावरील हवेवरच्या गव्हाबाबत ( Wheat crop ) राहुरीच्या म. फुले कृषी विद्यापीठाच्या महाबळेश्वर येथील कृषी संशोधकांनी पाहणी केली. या संशोधकांनी रेणावी आणि रेवणगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून अधिक माहिती घेतली.

खानापूर घाटमाथ्यावरील हवेवरचा गहू ( Wheat crop ) अर्थात पाणी न वापरता उत्पादित केलेला गहू, हे या भागातील वैशिष्ट्य आहे. या गव्हाला पान गहू आणि शेत गहू असे स्थानिक नाव आहे. याच नावाने या हवेवरच्या गहू पिकाच्या प्रजाती इथल्या लोकांनी आजवर जपल्या आहेत आणि वाढविल्या आहेत. या हवेवरच्या गव्हाच्या प्रजातीची पाहणी करण्यासाठी महाबळेश्वर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुशील मनीष गेरवा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दर्शन पवार, डॉ. संदीप डिगोळे, डॉ. चंद्रशेखर पवार, आशिष जाधव यांच्या पथकाने खानापूर घाटमाथ्यावरील रेवणगाव (जि. सांगली) या गावाला भेट दिली. यावेळी या पथकाने गहू उत्पादक शेतकरी नामदेव मुळीक, तुकाराम मुळीक, श्रीकांत हसबे आणि शरद मुळीक यांच्या शेतातील गव्हाची पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, “आम्ही पान गहू आणि शेत गहू हे बिन पाण्याचा किंवा बिगर पाण्यावर केवळ हवेवर येणारे गहू दरवर्षी पिकवितो. आम्ही पिढ्यानपिढ्या, पूर्वांपार हे पीक घेत आलो आहे. हा गहू दुष्काळी किंवा अवर्षण प्रवण प्रदेशांमध्ये घेता येतो. साधारणपणे आम्ही परतीचा पाऊस काळ संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात या गव्हाची पेरणी करतो. पुढच्या साडेतीन ते चार महिन्यांत पीक चांगले तयार होते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असते. खानापूर घाट माथ्यावरील तामखडी, ऐनवाडी, रेवणगाव, रेणावी, घोटी आदी गावांमध्ये या हवेवरच्या गव्हाचे उत्पादन घेतले जाते” असे त्यांनी सांगितले.

यावेळी कृषी संशोधक डॉ सुशील गेरवा म्हणाले, ” फक्त हवेवर येणाऱ्या बिन पाण्याच्या शेतगहू आणि पानगव्हाचे उत्पन्न इथले बहुतांश शेतकरी घेतात. जमिनीपासूनचा उंचावरील भाग, हवेतील आर्द्रता आणि थंडी या गोष्टी या पिकाच्या वाढीसाठी पोषक ठरत असाव्यात का ? या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या भागाला भेट दिली. गव्हाच्या या दोन्ही प्रजातींवर अधिकचे संशोधन करून सुधारित वाण विकसित करण्याचा आमचा मानस असल्याचेही डॉ.गेरवा यांनी सांगितले.

यावेळी खानापूर तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक तुषार शिंदे यांनी अधिक माहिती दिली. या पथकाचे स्वागत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड बाबासाहेब मुळीक यांनी केले.

Back to top button