

इचलकरंजी : शरद सुखटणकर
वीज दर सवलत मिळण्यासाठी आवश्यक ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, वाढीव वीज बिलासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी वाढीव वीज बिलाची टांगती तलवार यंत्रमागधारकांवर कायम आहे. "आता आश्वासन नको..ठोस कृती हवी" असा सूर वस्त्रोद्योगातून उमटत आहे. वीज दराबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे महावितरण आणि यंत्रमागधारक असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२७ अश्वशक्तीवरील जास्त जोडभार असणार्या यंत्रमागधारकांना वीज दर सवलत मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे अनेकांची नोंदणी झाली नाही. अनेकांना युटीआर नंबर आला परंतु, त्यांनाही वीज सवलतीचा लाभ मिळाला नाही. हा गोंधळ सुरू असताना ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वस्त्रोद्योगातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत वाढीव वीज बिले भरणार नाही असा पवित्रा शहरातील यंत्रमागधारकांनी घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर वस्त्रोद्योग मंत्र्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत केवळ प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वाढीव वीज दराबाबत ठोस निर्णय दिला नाही. वास्तविक गेल्या काही वर्षापासून वस्त्रोद्योग विविध संकटातून मार्गक्रमण करीत आहे. अशा परिस्थितीत त्याला संजीवनी देण्यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. ही परिस्थिती असताना वीज दर सवलत बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योगावर अन्याय करणारा असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. "बैठक नको..दौरे नको..तोंडी आश्वासने ही नकोत..ठोस कागदोपत्री निर्णय घ्या" अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या वस्त्रोद्योगातून उमटत आहेत.
शासन पातळीवर वीज दराबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मात्र महावितरणने यंत्रमागधारकांना वाढीव बिले पाठवली आहे. मुदत संपल्यानंतर वीज वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी यंत्रमागधारकांना वेठीस धरतील अशी स्थिती आहे. त्यामुळे यंत्रमागधारक आणि महावितरण यांच्यात रस्त्यावरचा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून औद्योगिक शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वस्त्रोद्योगात शांतता राखण्यासाठी वाढीव वीज दराबाबत तातडीने निर्णय होणे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नुकताच मकर संक्रांतीचा सण होऊन गेला आहे. त्यामुळे आता तिळगुळ घ्या..गोड गोड बोला असे नको. ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. तो निर्णय घेताना केवळ तोंडी नको तर तो ऑन पेपर येणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिली.