अत्याचार ग्रस्त महिलांना ‘सखी’चा आधार; ७० महिलांना कायद्याचा मोफत सल्ला

संग्रहित
संग्रहित

महिलांसोबत हिंसाचार व अत्याचार यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन केंद्र शासनाने 'सखी' वन स्टॉप क्राइसिस सेंटर हा उपक्रम चालवला आहे. अत्याचारित महिलांना पडत्या काळात मदत मिळत नाही. अशावेळी या उपक्रमांतर्गत संरक्षण, कायद्याचा मोफत सल्ला, निवारा यासह पुनर्वसनाचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोल्हापुरात ऑक्टोबर 2019 पासून योजनेची कार्यवाही सुरू आहे.

महिलांना शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक अशा अत्याचार यांना तोंड द्यावे लागते. अशा हिंसाचाराच्या शिकार ठरलेल्या महिला व मुलींना वैद्यकीय मदत, मानसिक आधार, कायदेशीर सल्ला व पोलिस संरक्षण यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रेमविवाह केलेल्या मुलींना तर सासरी तसेच माहेरीही मदत मागणे मुश्कील बनलेल्या अनेक घटना आहेत. ही गरज लक्षात घेऊन शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे सखी वन स्टॉप क्राइसिस सेंटर हा उपक्रम चालवला आहे.

कोल्हापुरात दोन वर्षांपासून कार्यरत

कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर 2019 पासून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत महिलांना 24 तास मदतनीस कार्यरत आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडून कावळा नाका येथील शासकीय निवासस्थानाच्या इमारतीत सखी केंद्राचे काम सुरू आहे. आतापर्यंत 152 केसेस दाखल असून यापैकी 134 निर्गत करण्यात आल्या. 79 महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे, तर 70 केसेसमध्ये कायद्याचे मार्गदर्शन मिळाले. आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सखी केंद्राचे कामकाज सुरू असून अध्यक्षा वैशाली महाडिक हे काम पाहत आहेत.

निवार्‍यासह इतर सुविधा

केंद्राकडे येणार्‍या पीडितेच्या 5 दिवसांच्या निवार्‍याची व्यवस्था केली जाते. यामध्ये मोफत निवारा व भोजनाचा समावेश आहे. तसेच पोलिस, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, पोलिस गुन्हा दाखल करण्यास मदत, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, वैद्यकीय मदत, आधार व समुपदेशन अशा सुविधाही पुरवल्या जात आहेत.

कोणकोणत्या गुन्ह्यांत मिळते मदत ?

कौटुंबिक हिंसा, हुंड्यासाठी छळ, लैंगिक छळ, छेडछाड, सायबर गुन्हे, अपहरण, बलात्कार, कामाच्या ठिकाणी त्रास, अ‍ॅसिड हल्ला, जबरदस्ती देहव्यापारास भाग पाडणे अशा प्रकारांमध्ये महिलांना मदत दिली जाते.

मदतीसाठी संपर्क क्रमांक
9049093763
8208759546

दाखल केसेस : 152
निर्गत केसेस : 134
कायद्याचा सल्ला : 70
समुपदेशन : 79

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news