

कोल्हापूर ; सागर यादव : धार्मिक महत्त्व सांगणारी करवीर काशी, ऐतिहासिक वारसा जपणारी छत्रपतींची राजधानी, पुरोगामी वारसा जपणारी शाहूनगरी यांसह अनेक वैशिष्ट्ये आणि निसर्गसंपन्नतेने परिपूर्ण असणार्या कोल्हापूर विषयी जगभरातील पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. यामुळे 'कोल्हापूर दर्शन साठी' जगभरातील पर्यटकांकडून ऑनलाईन सोशल मीडियावरून पर्यटनाविषयी माहितीच्या पेजला लाखो लोक भेटी देत आहेत. सर्व क्षेत्रांप्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही नवचैतन्य निर्माण झाले आहे. कोल्हापूर दर्शन साठी जिल्ह्यात पर्यटकांची रीघ लागली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे बंद असणारा पर्यटन हंगाम पूर्वपदावर येऊ लागला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीपाठोपाठ हिवाळी पर्यटनाचा हंगाम जोमात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांची रीघ लागली आहे.
अंबाबाई-जोतिबा-नृसिंह-बाळूमामा यांसह विविध मंदिरे, पन्हाळा-विशाळगड-भुदरगड यांसह विविध किल्ले, नवा-जुना राजवाडा, कणेरी मठ म्युझियम, रंकाळा तलाव, शाहू जन्मस्थळ यांसह ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळांवर दररोज गर्दी दिसत आहे.
रविवारीही शहरातील रंकाळा तलाव, नवा राजवाडा, जुना राजवाडा, लक्ष्मी विलास पॅलेस येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे दसरा चौक, बिंदू चौक, टेंबे रोडसह विविध पार्किंगची ठिकाणे हाऊसफुल्ल झाली होती. पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील हॉटेल्स-रेस्टॉरंट, अन्नछत्र, धर्मशाळा, भक्त निवासांत मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले होते.
पर्यटकांकडून कोल्हापूरची वैशिष्ट्ये असणार्या वस्तू व खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. कोल्हापुरी गूळ, चटणी (तिखट) चप्पल, साज व नथ, फेटा, घोंगडे, अशा 'कोल्हापूरचा अभिमान' सांगणार्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची पर्यटकांकडून आवर्जून खरेदी होत आहे.
तसेच तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ, मटण-भाकरी, रक्ती-मुंडी, वडापाव, भडंग-भेळ अशा विविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी खाऊ गल्ली, हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शन पाससाठी नवरात्रौत्सव ते दिवाळी या महिनाभराच्या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमांचा आवर्जून वापर करण्यात आला.
देवस्थान समितीच्या वतीने सुरू असणार्या फेसबुक पेजला 5,482 लाईक, 48,707 फॉलो केले तर प्रत्यक्ष 10 सी.आर. लोक पेजवर पोहोचले. यू ट्यूबवर 6 हजार लोकांनी सबस्क्राईब केले तर 5 सीआर लोक पोहोचले.
इन्स्टाग्रामला 405 पोस्टस्, 976 फॉलोअर्स, 1.5 सीआर लोक पोहोचले. टि्वटरला 1 हजार 170 फॉलोअर्स असून 50 लाख लोक पोहोचले आहेत.
अंबाबाई मंदिर वेबसाईटला (लाईव्ह दर्शनासह) 3 कोटी 37 लाख 35 हजार 576 हिट्स मिळाल्या. त्यापैकी 4 लाख 33 हजार 784 लोकांनी इ-पास साठी नोंदणी केली. तर दख्खनचा राजा जोतिबाच्या वेबसाईटला 1 कोटी 98 लाख 36 हजार 786 हिट्स मिळाल्या.
त्यापैकी 2 लाख 6 हजार 456 लोकांनी ई-पाससाठी नोंदणी केली. अशा एकूण 5 कोटी 35 लाख 72 हजार 362 लोकांच्या देवस्थानच्या वेबसाईटला हिट्स मिळाल्या. त्यापैकी 6 लाख 40 हजार 240 भाविकांनी ई-पाससाठी नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेतला.
विविधतेने परिपूर्ण असणार्या कोल्हापूरला जगभरातील पर्यटकांची पहिली पसंती आहे. यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनासंदर्भातील इत्थंभूत माहिती घेण्यासाठी ऑनलाईन माध्यमांचा पर्यटकांकडून आवर्जून आणि मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
पर्यटन संस्था – संघटना, टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माहितीसाठी तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ई-दर्शन पाससाठी जगभरातील लाखो पर्यटक ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने माहिती घेत असतात.