

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा: केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा घाट घातला आहे. याविरोधात जो राजकारणी रक्त सांडून एक रक्कमी एफआरपीविरोधात रस्त्यावर लढाई करून यशस्वी लढा देईल, त्या राजकीय व्यक्तीला स्वतःची एक एकर बागायती जमीन बक्षीस देण्याची घोषणा नांदणी (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील या शेतकर्याने केली आहे.
तसेच राजू शेट्टी यांच्यावर बोलणार्यांना एफआरपीविरोधात रस्त्यावर लढाई करावी आणि शेतकर्यांना न्याय द्यावा. यासाठी एक एकर जमीन बक्षिस देण्याची तयार दर्शवली आहे.
नांदणी येथील रामगोंडा पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांची एकूण १८ एकर जमीन आहे. त्यांच्याकडे उस फ्लॉवरची शेती असते. गेल्या काही दिवसांपासून एकरकमी एफआरपी देण्याबाबत चर्चा ऊस पट्ट्यात सुरू आहेत. याविरोधात आंदोलनाची वज्रमूठ बांधण्याचे काम शेतकरी संघटनांकडून होत आहे; पण या धोरणाच्या विरोधात कोणताही राजकारणी व्यक्ती बोलायला अथवा आंदोलन करण्यासाठी तयार नाही. यामुळे ऊस उत्पादकात प्रचंड नाराजी आहे.
ऊस उत्पादकांच्या हक्काच्या दराला कात्री लागत असल्याने अर्थकारण कोलमडण्याची दाट शक्यता आहे.
ही बाब कोणीच गांभीर्याने घेत नसल्याने पाटील यांनी उद्विग्नतेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.
या घोषणेनंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या
ला दुजोरा दिला. शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कोणीही नेता याप्रश्नी रस्त्यावर उतरायला तयार नाही. धोरणकर्त्यामध्ये कोणी वाली आहे की नाही. हाच प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे. त्यामुळेच अत्यंत विचारपूर्वक मी ही घोषणा केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
राज्यात २८८ आमदार आणि ४८ खासदार आहेत. त्यांना माझे हे आव्हान आहे.
राजू शेट्टी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही लोकप्रतिनिधी माझे आव्हान स्वीकारू शकतात, असे पाटील यांनी सांगितले.
भले राजकीय लोकांसाठी एक एकर जमीन काहीच नसेल, पण आमच्यासाठी ही कष्टाची काळी आई आहे.
जमीन गेली तर चालेल पण शेतकर्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ऊसाच्या एफआरपीचेचे तीन तुकडे करण्याचा डाव साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारने आखला आहे.
त्याविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक अभिनव आंदोलन छेडले आहे.
एफआरपीच्या तुकडीकरणाविरोधात एका टोलफ्री क्रमांकावर मिस्डकॉल देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते.
हीमोहिम सुरू होवून तीन दिवस झाला असून सव्वादोन लाख शेतकर्यांनी मिस्डकॉल दिला आहे.
हेही वाचलंत का?