Kolhapur News : शाहूवाडी तहसीलवर बुधवारी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

Kolhapur News : शाहूवाडी तहसीलवर बुधवारी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
Published on
Updated on

सरूड; पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या पाणीपट्टीमध्ये सुलतानी पद्धतीने केलेली अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात शेती पंपधारक व वीज ग्राहक संघटनेच्या वतीने शाहूवाडी तहसील कार्यालयावर बुधवारी (ता. २७) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती शेकापचे जिल्हा सरचिटणीस भाई भारत पाटील यांनी दिली. पंचायत समिती कार्यालयापासून सकाळी ११ वा. मोर्चाला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

तुकड्यांची शेती, सातत्याने महागाई वाढ, घटणारे शेती उत्पन्न, निविष्ठांचे गगनाला भिडलेले दर आदी कारणाने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातच शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेती मालाचे भाव मातीमोल होत आहेत. परिणामी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षीत बेकारीची वाढती संख्या शेतीवरचा भार वाढवत आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतील शेतकरी कुटुंबे नाईलाजाने शेती व्यवसायच सोडून देण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

महाराष्ट्रात इतक्या भीषण उदासीनतेचे चित्र दिसत असताना नुकतीच शासनाने शेतातील बारमाही पिकासाठीच्या पाणीपट्टीत हेक्टरी १३,६०८ रूपये अशी १० पट सुलतानी दरवाढ केली आहे. कृषी सिंचन पंपांना मीटर संलग्न करूनच पाणीउपसा करणे अनिवार्य केले आहे. नसता दंड वसूलीचा फतवा काढला आहे. शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने मीटरची खरेदी करावी लागणार आहे. त्याच्या दुरुस्तीचा खर्च, प्रति एचपी भाराने वीज आकारणी आदी बाबी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. याची शासनाला वेळीच जाणीव करून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळेपर्यंत वाढीव पाणीपट्टीचे धोरण लादू नये, अशी आग्रही मागणी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी नामदेवराव पाटील, राजेंद्र देशमाने, दगडू शेंडे, राजाराम मगदूम, सुरेश म्हाऊटकर, मनीष तडावळेकर, सुरेश घोलप, अॅड प्रणावादित्य थोरात, आनंदा पाटील (जावळी) आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news