उठा उठा निवडणूक आली… कार्यकर्त्यांची आठवण झाली | पुढारी

उठा उठा निवडणूक आली... कार्यकर्त्यांची आठवण झाली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय समित्यांची तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या निवडीची मागणी करणार्‍या कार्यकर्त्यांची अखेर निवडणुका जवळ आल्यावर नेत्यांना आठवण झाली. यासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहामध्ये घेऊन शासकीय समिती, विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार नावे देण्याच्या सूचना महायुतीतील पक्षाच्या गटनेत्यांना दिल्या.

दि. 31 डिसेंबरपर्यंत महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची नावे द्यावीत, नावे आल्यानंतर तत्काळ समित्या गठित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

बैठकीस खा. धनंजय महाडिक, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. विनय कोरे, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजवर्धन नाईक-निंबाळकर, विजय जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, सत्यजित कदम, आदील फरास, मानसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन, तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. अद्यापही अनेक शासकीय समित्या गठित करण्यात आलेल्या नाहीत. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी त्या गठित होणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. 2016-17 पासून अद्यापपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदे भरलेली नाहीत, त्याच्याही नियुक्त्या होणे आवश्यक आहे. आतापर्यंत नियोजन, डोंगरी समिती, वृद्ध कलावंत, दक्षता, ज्येष्ठ नागरिक, बालकामगार, वेठबिगार, मराठी भाषा या समिती गठित झाल्या आहेत; मात्र डीआरडीए, एमएससीबी, सीजीएस, उद्योग, दिव्यांग, सैनिक, सीपीआर, पर्यावरण, खनिज, तंबाखू विरोधी, राष्ट्रीय आरोग्य, अल्पसंख्याक, भ—ष्टाचार आदी समित्यांचे गठण झाले नसल्याचे कार्यकर्त्यांनी पालकंत्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे त्यांनी समिती गठित करण्यासाठी लवकर नावे द्यावीत, असे सांगितले.

सत्ताधारी पक्षांना प्रत्येक तीस टक्के आणि विरोधी पक्षांना दहा टक्के असे निधी वितरणाचे सूत्र यापूर्वीच ठरले आहे. मात्र त्यासाठी त्या प्रमाणात विकासकामे सुचवली गेली नसल्याने निधी शिल्लक आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने सर्वांनी विकासकामांची यादी संबंधित विभागाकडे सादर करावी, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

शिंदे गटाचे प्रमुख अनुपस्थित

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने बैठकीस अनुपस्थित होते. त्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू होती.

Back to top button