आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात; एक जखमी

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात; एक जखमी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाईदेवीचे दर्शन आटोपून वाडी रत्नागिरीकडे जोतिबा दर्शनाला चाललेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मोटारीचा अपघात झाला. ताफ्यातील मोटारीने पाठीमागून त्यांच्या मोटारीला जोराची धडक दिली. मागील मोटारीत बसलेले सावंत यांचे स्वीय सहायक रविराज जाधव (रा. पुणे) या अपघातात जखमी झाले. धडकेनंतर एअरबॅग उघडल्याने सुदैवाने मोठी हानी टळली.

मंत्री तानाजी सावंत हे रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर होते. दुपारी तीनच्या सुमारास अंबाबाईदेवीचे दर्शन आटोपून त्यांचा ताफा जोतिबा डोंगराच्या दिशेने निघाला होता. रत्नागिरी मार्गावरील सोनतळीनजीक त्यांच्या वाहनामागील मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने सावंत बसलेल्या मोटारीला पाठीमागून धडक बसली. पाठीमागील मोटारीत सावंत यांचे दोन स्वीय सहायक होते. त्यातील रविराज जाधव यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच मोटारीच्या इंजिनमधूनही धूर आला. ही वाहने बदलून मंत्री सावंत अन्य एका मोटारीतून जोतिबाकडे रवाना झाले. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे.

ताफ्यात रुग्णवाहिकाच नाही

आरोग्यमंत्री सावंत यांच्या ताफ्यामध्ये रुग्णवाहिकेचा समावेश नव्हता. मागील महिन्यातही ते दौर्‍यावर असताना रुग्णवाहिका नव्हती, ही बाब आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आली होती. मात्र, रविवारीही ताफ्यात रुग्णवाहिका नसल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news