Kolhapur News : पुढारी राईज अप-महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची फेब्रुवारीत धूम | पुढारी

Kolhapur News : पुढारी राईज अप-महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची फेब्रुवारीत धूम

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : क्रीडानगरी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत शालेय-महाविद्यालयीन महिला अ‍ॅथलेटिक्सचा थरार रंगणार आहे. दैनिक ‘पुढारी’च्या वतीने ‘पुढारी राईज-अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स् स्पर्धेचे आयोजन केले आहे. विविध गटांत होणार्‍या या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणीला मंगळवार, दि. 26 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

महिलांना प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी दैनिक ‘पुढारी’च्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. महिलांच्या शारीरिक, आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांच्यात खेळांची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या क्रीडा कौशल्याला पाठबळ द्यावे, या उद्देशाने ‘पुढारी राईज अप’अंतर्गत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.

सहा वयोगटांत, तीन जिल्ह्यांसाठी होणार स्पर्धा

ही स्पर्धा 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षांखालील अशा एकूण सहा वयोगटांत होणार आहे. या स्पर्धेत कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांतील महिला खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.

19 प्रकारांची होणार स्पर्धा

ही स्पर्धा विविध 19 प्रकारांत होणार आहे. यामध्ये 30, 50, 80, 100, 200, 400, 600, 800, 1 हजार, 1500 व 3 हजार मीटर धावणे, 80 व 100 मीटर अडथळा, 4 बाय 50 मीटर, 4 बाय 100 मीटर व 4 बाय 400 रिले, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी या प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे.

प्रशस्तिपत्र, पदकांसह रोख बक्षीस

स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्यपदकासह प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे. याखेरीज विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊनही गौरविण्यात येणार आहे.

ऑनलाईन नावनोंदणी करता येणार

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थिनींना हा अर्ज ऑनलाईन https://kdaa.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. या संकेतस्थळाची लिंक मंगळवारपासून खुली केली जाणार आहे.

अर्जाद्वारेही करता येणार नोंदणी

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरूनही नोंदणी करता येणार आहे. दैनिक ‘पुढारी’तून या स्पर्धेची प्रवेशिका (नोंदणी अर्ज) प्रकाशित केला जाणार आहे. या अर्जाचे कात्रण कापून, त्यावरील सर्व माहिती सहभागी होणार्‍या खेळाडूंना भरावी लागणार आहे. यानंतर पूर्ण भरलेला हा अर्ज दैनिक ‘पुढारी’च्या नजीकच्या कार्यालयात दि. 2 ते 25 जानेवारी या कालावधीत जमा करावा लागणार आहे.

नोंदणी अर्जाची पोहोच घ्यावी

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंनी भरलेला अर्ज नजीकच्या दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयात सादर करावा. अर्ज सादर करताना त्या अर्जाची झेरॉक्स प्रत काढून, त्यावर कार्यालयाची पोहोच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन करता येणार नोंदणी

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना दि. 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज नोंदणी बंद होणार आहे; मात्र ऑफलाईन प्रवेशिका दि. 25 जानेवारीपासून दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयात स्वीकारणे बंद केले जाणार आहे.

मोठ्या संख्येने सहभागी व्हा

समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सातत्याने अग्रणी भूमिका घेणार्‍या दैनिक ‘पुढारी’च्या वतीने विद्यार्थिनींसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी कोल्हापूर-9834433274- रोहित, सांगली-9766213003-परितोष, सातारा-8605577799-विशाल या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन, दैनिक पुढारी परिवाराने केले आहे.

राईजअप : ‘पुढारी’ने महिला सबलीकरणासाठी उचललेले पाऊल

‘पुढारी राईजअप’ ही संकल्पना स्त्री शक्तीच्या सबलीकरणासाठी दैनिक ‘पुढारी’ने उचललेले पाऊल आहे. महिलांच्या क्रीडा प्रतिभेला सुरुवातीच्याच काळात बळ देत, योग्य व्यासपीठ मिळवून देत, तिच्या स्वप्नांना आत्मविश्वासाचे नवे पंख मिळावेत, या उद्देशाने योग्य मार्गदर्शनाने त्यांच्या क्रीडा प्रकारात पुढे जाण्यासाठी या महिलांना मोठी संधी निर्माण करून दिली जात आहे.

ही संकल्पना पुण्यात गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला खेळाडूंना कोणतेही नोंदणी शुल्क ठेवलेले नाही, सहभागींकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, याचा ‘पुढारी’ परिवाराला अभिमान आहे. ‘पुढारी’ समूहाच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ आणि ऑनलाईन माध्यमातून या स्पर्धांना ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळणारी व्यापक प्रसिद्धी, यामुळे या स्पर्धा शहरातील प्रमुख लक्षवेधी इव्हेंट ठरत आहे. ‘पुढारी’ने गेली दोन वर्षे या स्पर्धा पुणे येथे यशस्वीपणे घेतल्या. आता ‘राईजअप’ कोल्हापुरात येत असून, अशा स्पर्धा आयोजित करणारे ‘पुढारी’ हे एकमेव मीडिया हाऊस आहे.

Back to top button