बिद्री; टी. एम. सरदेसाई : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. 'बिद्री'चे चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्यामुळे गट नेते आपल्या गटाला अधिक जागा कशा मिळतील, यासाठी मोर्चे बांधणी करीत आहेत. 'बिद्री' च्या निवडणुकीत काँग्रेस म्हणून आमदार सतेज पाटील देखील उतरले असून कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करीत आहेत.
संबंधित बातम्या :
बिद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांचे २१८ गावांचे आहे. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील राजकीय गट, पक्ष जरी विरोधी असला तरी जमवून घेणारे नेते यामुळे 'बिद्री' च्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय संदर्भ बदलाचा इतिहास आहे. गत निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येत निवडणूक लढविली. मात्र यावेळी संदर्भ बदलेले आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना मानणारे करवीरसह राधानगरी व भुदरगडमध्ये कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांच्याकडे तिन्ही तालुक्यातील शिष्टमंडळे भेटून 'बिद्री' साठी आग्रह धरत आहेत.
किमान ६ ते ७ जागा मिळाव्यात असा आग्रह धरत, जो गट अधिक जागा देईल तिकडे पाठींबा देवूया, असेही कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. पण आ. पाटील यांची मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी असलेली मैत्री पहाता के. पी. पाटील गटाकडे कल असल्याचे दिसते. याबाबत के. पी. पाटील यांच्याशी प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. अन्य नेत्यांशी दोन ते तीन दिवसात चर्चा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या जागा तिन्ही तालुक्यात वाटप करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. करवीरमधील ७ गावे समाविष्ठ असून ३४४८ मतदार संख्या आहे. येथे यापूर्वी १ जागा मिळत होती. सध्या करवीरने २ जागांची मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यातून सरवडे, तुरंबे परिसरातील कार्यकर्ते आग्रही आहेत. किमान तीन जागांची मागणी आहे. भुदरगडमध्ये गारगोटी, कूर परिसरातून शिष्टमंडळे भेटली आहेत. त्यामुळे किती जागा मिळणार? आणि कसे वाटप करणार? हा आमदार पाटील यांच्यापुढे पेच आहे.
पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.३०) काँग्रेसमार्फत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यामुळे 'बिद्री' च्या निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्या भूमिकेला महत्व आले असून किती जागा पदरात पाडून घेणार हे १७ नाव्हेंबरला अर्ज माघारी दिवशी कळणार आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस म्हणून अनेक कार्यकर्ते 'बिद्री' निवडणुकीत इच्छुक आहेत. शिष्टमंडळाच्या भेटीत अर्ज भरा नंतर पाहू, असे सतेज पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी महिला इच्छुकांसह सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापूर येथील सासने ग्राऊंडवर सर्वजण एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे समजते.
हेही वाचा :