कोल्हापूर : गळती धरणाला; भगदाड राज्याच्या तिजोरीला! | पुढारी

कोल्हापूर : गळती धरणाला; भगदाड राज्याच्या तिजोरीला!

सुनील कदम

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे; पण गळती काही निघालेली नाही, त्यामुळे गळतीच्या पाण्यासह या कामासाठी मंजूर करण्यात आलेला निधीही वाहून गेल्याचे स्पष्ट होते. आता पुन्हा याच कामासाठी 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे; मात्र तो निधी तरी सार्थकी लागून धरणाची गळती कायमस्वरूपी थांबणार का, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

1977 साली काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाचे काम सुरू झाले आणि 1983 साली काम पूर्ण झाले. मात्र, धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 16 वर्षांतच म्हणजे 1999 साली धरणाला गळती लागल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला ही गळती प्रतिसेकंद 50 ते 90 लिटर एवढी छोटी होती; मात्र कालांतराने ती दिवसेंदिवस वाढत जाऊन आता ती प्रतिसेकंद 350 लिटरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. कोणत्याही धरणातून प्रतिसेकंद 250 लिटरपर्यंत पाण्याची गळती होत असल्यास ती बाब फारशी धोकादायक समजली जात नाही; पण त्यापेक्षा जादा गळती होत असल्यास ते धोकादायक समजण्यात येते. काळम्मावाडी धरणातून तर प्रतिसेकंद 350 लिटर किंवा त्यापेक्षा जादा पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून ही बाब जास्तच धोकादायक समजायला पाहिजे.

मागील अठरा वर्षांपासून या धरणाची गळती काढण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या कामासाठी पाच-पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे; मात्र गळती काही निघत नाही. मागील अठरा वर्षांच्या कालावधीत या कामासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. तीन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने धरणाची गळती पूर्णपणे दुरुस्त झाल्याचे जाहीर केले होते; मात्र पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील फोलपणा स्पष्ट झाला होता. त्याचबरोबर या कामासाठी करण्यात आलेला खर्चही गळतीच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याचे स्पष्ट झाले होते. या सगळ्या बाबी विचारात घेता, धरण दुरुस्तीच्या कामांमध्येच कुठे तरी गफलती होत असाव्यात, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत करण्यात आलेल्या कामांची सखोल चौकशी होण्याचीही गरज आहे.

धरणाला लागलेल्या गळतीमुळे 25.39 टीएमसी क्षमतेचे हे धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरता येत नाही. यंदाही धरणात तीन टीएमसी कमीच पाणीसाठा करण्यात आलेला आहे. या धरणातील चार टीएमसी पाण्यावर कर्नाटकचाही हक्क आहे. धरणाच्या गळतीमुळे वाहून जाणारे पाणी आणि कर्नाटकच्या वाट्याचे पाणी विचारात घेता, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लोकांना यंदा किमान चार ते पाच टीएमसी पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

आता शासनाने या धरणाची गळती काढण्यासाठी नव्याने 80 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत; पण हा निधी यावर्षी निम्मा आणि पुढील वर्षी निम्मा, अशा दोन टप्प्यांत मिळणार आहे. टेंडर मंजुरीसह अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला अजून किमान दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, पुन्हा पावसाळ्यात हे काम थांबवावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा काम सुरू होऊन पूर्ण व्हायला 2025 साल उजाडावे लागणार आहे. या बाबी विचारात घेता, काळम्मावाडी धरणाला लागलेली गळती अजून दोन पावसाळे तरी कायम राहणार असल्याचे दिसते.

इतके पाणी जात आहे वाहून!

सध्या धरणाच्या गळतीतून प्रतिसेकंद 350 लिटर पाणी वाहून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे प्रतिमिनिट 21 हजार लिटर, प्रत्येक तासाला 12 लाख 60 हजार लिटर आणि दिवसाला 3 कोटी 2 लाख 40 हजार लिटर पाणी वाहून जात आहे. वर्षाचा हिशेब केला, तर या गळतीतून वर्षाला 1,103 कोटी 76 लाख लिटर म्हणजेच जवळपास अर्धा टीएमसी पाणी वाहून जात आहे. एवढे पाणी कोल्हापूरची वर्षभराची तहान भागवू शकते.

गळतीमुळे संपूर्ण धरणालाच धोका!

कोणत्याही धरणाला प्रतिसेकंद 250 लिटरपेक्षा जादा गळती लागली असेल, तर ती बाब धोकादायक समजली जाते. त्यातच काळम्मावाडी धरणासारखी ही गळती धरणाच्या पायातून होत असेल, तर ती जास्तच धोकादायक समजली जाते. धरणाच्या पायातून होणार्‍या अशा गळतीमुळे संपूर्ण धरणाचाच पाया कमकुवत होण्याचा धोका असतो. ही गळती लवकरात लवकर दुरुस्त केली नाही, तर धरण फुटण्याचा धोका असतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Back to top button