कोल्हापूर : ….तोपर्यंत सरूडच्या हद्दीतील ऊसतोड करू नये; गावसभेत बहुमताने ठराव मंजूर | पुढारी

कोल्हापूर : ....तोपर्यंत सरूडच्या हद्दीतील ऊसतोड करू नये; गावसभेत बहुमताने ठराव मंजूर

सरुड; पुढारी वृत्तसेवा : सरुड (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीने घेतलेल्या गावसभेत मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचा वाढीव हप्ता ४०० रुपये तसेच येत्या गळीत हंगामासाठी योग्य ऊसदराची संबंधित साखर कारखाने जोपर्यंत जाहीर घोषणा करीत नाहीत, तोपर्यंत गावच्या हद्दीतील ऊसाची तोड करू दिली जाणार नाही, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रत आक्रोश पदयात्रेच्या निमित्ताने सरुड येथे आलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आली.

या ठरावाबद्दल राजू शेट्टी यांनी सरूडकर शेतकऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत. सरूड गावासह कवठेपिराण, दुधगाव (ता. मिरज, जि. सांगली) या गावांनी देखील असेच गावसभेचे ठराव पारित करून शेतकऱ्यांच्या चळवळीला मोठे बळ दिले असल्याचे सांगत गटतट विसरून सर्वच गावांनी वरील तिन्ही गावांचे अनुकरण केले पाहिजे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली आहे.

दरम्यान, शेतातील ऊस मातीमोल दराने तोडून नेणारे साखर कारखाने ऊसदराच्या बाबतीत नागवतात हे जगजाहीर आहे. याचा विचार करता सरुड येथील गावसभेत सचिन सर्जेराव पाटील या तरुण शेतकऱ्याने ऊसदराच्या निश्चितीशिवाय गावच्या हद्दीतील ऊसतोड करू नये, या मांडलेल्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. याला मनीष महिपती तडवळेकर या तरुण शेतकऱ्याने अनुमोदन दिले. तर ठरावाला अन्य उपस्थित शेतकऱ्यांनी बहुमताने पाठिंबा दर्शविला.

सावधानतेने कारखानदारांना धडा शिकवा!

शेट्टी यांनी संबंधित ठरावाची प्रत स्वीकारताना निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावध केले आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन मोडून काढण्याची कारखानदारांनी रणनीती आखली आहे. प्रसंगी बळाचा वापर होणार आहे. कारखाना संचालक, कर्मचारी यांच्या मदतीने ताकदीने ऊस वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचे ऐकून असल्याचे शेट्टींनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले आहे. ही चळवळ केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाही तर संपूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. कारखानदारांचा हा डाव वेळीच ओळखावा आणि काळ सोकावू द्यायचा नसेल तर प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने या लुटारू कारखानदारांना कायमचा धडा शिकविण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button