

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराचे दरवाजे भाविकांना खुले झाले आहेत. भाविकांना अंबाबाईचे पहाटे चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. मात्र ऑनलाईन पास घेतलेल्यानाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. अन्य भाविकांसाठी मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांना पास असणे बंधनकारक आहे. पाससाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. दर्शना वेळी आधार कार्डची झेरॉक्स प्रत दाखवणे बंधनकारक राहणार आहे. दर्शनासाठी ४८ तास आधी बुकिंग करता येणार आहे. 60 वर्षावरील व्यक्ती, दहा वर्षाखालील मुले तसेच गर्भवती महिला आणि आजारपण असलेल्यांना प्रवेश नसणार आहे.
मंदिरातील पालखी सोहळ्याला यंदा भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील सर्व धार्मिक विधी हे संपन्न होणार आहेत. मात्र दरवर्षी नवरात्रौत्सवात साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नाहीत. पालकमंत्री सतेज पाटील आणि देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या विषयी माहिती दिली.