कोल्हापूर : सातारा ते कागल या मार्गावर सध्या महामार्ग तर सोडाच; पण साधा चांगला मार्गसुद्धा अस्तित्वात नाही. असे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून टोलवसुली मात्र बिनधास्तपणे सुरू आहे. घेणार्यांना आपण कशाचा टोल घेतोय, याची लाज नाही आणि देणार्यांना आपण कशाचे पैसे देतोय, याची जाणीवच नसल्यासारखी अवस्था आहे.
सातारा-कागल महामार्गावरून दररोज 90 हजार ते एक लाख वाहने प्रवास करतात. सार्वजनिक सुट्ट्या, सणावाराला तर ही संख्या आणखी वाढते. सध्या टोल नाक्यांवरील प्रचलित दरानुसार प्रत्येक वाहनधारकाकडून एका टोल नाक्यावर सरासरी शंभर रुपये टोल आकारला जातो, असे गृहीत धरल्यास एका टोल नाक्यावर दिवसाकाठी 90 लाख ते 1 कोटी रुपयांचा टोल गोळा केला जातो, असे म्हणावे लागेल. सातारा ते कागल मार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील किणी आणि सातारा जिल्ह्यातील तासवडे असे दोन टोल नाके लागतात, म्हणजे दोन टोल नाक्यांची मिळून दररोजची वसुली 1 कोटी 80 लाख ते 2 कोटी! मागील दोन वर्षांची आकडेवारी विचारात घेतली, तर या मार्गावरील दोन टोल नाक्यांवरील टोल वसुलीचा आकडा 1,314 ते 1,460 कोटी रुपये इतका होतो. यामध्ये मोठ्या वाहनांच्या मोठ्या टोल रकमा धरलेल्या नाहीत. तरीदेखील सरासरी टोलवसुली इतकी झाली, असे म्हणावे लागेल.
कागल ते सातारा यादरम्यान किणी आणि तासवडे हे दोन टोल नाके या ठिकाणी पूर्वी करण्यात आलेल्या चौपदरी महामार्गाच्या खर्चाच्या वसुलीसाठी उभारण्यात आलेले आहेत; पण सध्या हा महामार्गच अस्तित्वात नाही. कागलपासून सातार्यापर्यंत दहा-पंधरा किलोमीटरचा अपवाद वगळला, तर या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनांचा सगळा प्रवास सेवा रस्त्यांवरूनच चालतो; मग ज्या रस्त्यासाठी टोल आकारणी सुरू आहे, तो रस्ताच अस्तित्वात नसेल तर कशाचा टोल आकारला जातोय आणि हे कोणत्या कायद्यात बसते, याचा संबंधित यंत्रणांना जाब विचारण्याची गरज आहे.
ज्या रस्त्यासाठी टोल आकारला जातो त्या रस्त्याची अवस्था चांगली नसेल, तो रस्ता खराब झाला असेल, तर संबंधित कंपन्यांनी तो रस्ता दुरुस्त करेपर्यंत संबंधित मार्गावरून प्रवास करणार्या वाहनधारकांकडून टोल वसूल करू नये, रस्ता अपूर्ण असेल तर टोलवसुली करू नये, असा नियम आहे. इथे तर सातारा-कागल हा महामार्गच सध्या अस्तित्वात नाही, जो पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे, तो भयावह स्वरूपाचा आहे, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवावरची जोखीम असे होऊन बसले आहे, तरीदेखील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवर बिनदिक्कतपणे टोलवसुली मात्र सुरू आहे. टोल नाक्यावर जर वाहनधारकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागले, टोल नाक्यावर 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या, तर मागच्या वाहनांना टोल न देता जाण्याचा हक्क आहे; पण किणी आणि तासवडे टोल नाक्यांवर अनेकवेळा वाहनांना टोलसाठी खोळंबून राहावे लागते; पण टोलवसुली केल्याशिवाय एकही वाहन पुढे सोडले जात नाही, जर कुणी नियमावर बोट ठेवायचा प्रयत्न केला, तर प्रत्येक टोल नाक्यावर संबंधित ठेकेदारांनी गुंडांच्या टोळ्या पोसलेल्याच आहेत. या गुंडांच्या टोळ्या संबंधित वाहनधारकाला झोडपून काढायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. काहीवेळा लोकप्रतिनिधींनाही या गुंडांच्या हातचा चोप मिळाल्याची उदाहरणे आहेत. आमदारांना चोप देणारी ही मंडळी सर्वसामान्य वाहनधारकांना कितपत भीक घालत असतील, त्याचा अंदाज लावण्यास हरकत नाही.
प्रत्येक टोल नाक्याच्या मागे-पुढे रात्रंदिवस पाच-सहा पोलिसांसह एक पोलिस गाडी थांबलेली दिसते. नाक्यावर वाहनधारक आणि टोल वसुली कर्मचार्यांची वादावादी ही नित्याची बाब आहे. अनेकवेळा नियमबाह्य टोलवसुली सुरू असते; पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कधीही यामध्ये हस्तक्षेप करून टोल नाक्यावरील कर्मचार्यांना समज दिल्याचे दिसून येत नाही. उलट हे पोलिस जणू काही टोल कंपनीसाठीच तैनात केल्यासारखे त्यांचे वर्तन असते. जोडीला त्यांची त्यांची वेगळी टोलवसुलीही सुरू असते. एकूणच सातारा-कागल मार्गावर सध्या सुरू असलेली टोलवसुली म्हणजे सगळा सावळागोंधळ आहे. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
सातारा-कागल मार्गावर किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवर सध्या जी काही टोलवसुली सुरू आहे, ती नेमकी कशासाठी सुरू आहे, कोणती कंपनी ही टोलवसुली करते, या टोल नाक्यांची मुदत आणखी किती दिवस आहे, याचा या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनधारकांना थांगपत्ताच नाही. टोल कंपन्यांनी गाडी अडवायची, वाहनधारकांनी गप्पगुमानपणे अस्तित्वातच नसलेल्या महामार्गासाठी टोल द्यायचा आणि चालते व्हायचे, असा सगळा मामला सुरू आहे. जो रस्ताच अस्तित्वात नाही त्याच्यासाठी टोलवसुली करणारे हे दोन टोल नाके शासकीय कारभाराचा पंचनामा करणारे आहेत.