नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ( दि. 26) टोल टॅक्सबाबत एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जर रस्ते चांगल्या स्थितीमध्ये नसतील तर महामार्गावर काम करणाऱ्या एजन्सींनी प्रवाशांकडून टोल वसूल करू नये. सॅटलाईटवर आधारित टोल वसुली प्रणालीवर आयोजित जागतिक कार्यशाळेत गडकरी बोलत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅटलाईटवर आधारित टोल वसुली ही प्रणाली चालू आर्थिक वर्षातमध्ये 5 हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या महामार्गांवर लागू केली जाणार आहे. चांगल्या दर्जाची सेवा देत नसाल तर टोल आकारू नका, असे गडकरी म्हणाले. आमच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही प्रवाशांकडून शुल्क आकारण्याची आणि टोल वसूल करण्याची घाई करत आहोत. तुम्ही जिथे उत्तम दर्जाचा रस्ता देत आहात तिथेच वापरकर्ता शुल्क आकारावे, असे ते म्हणाले. खड्डे आणि चिखलमय रस्त्यांवरही टोल आकारला तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विद्यमान फास्टॅग प्रणालीमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली लागू करण्याची योजना आखत आहे. सुरुवातीला, एक संकरित मॉडेल वापरले जाईल, ज्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आधारित टोल संकलन आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित टोल प्रणाली दोन्ही एकत्र काम करतील.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी आणि गोपनीयतेची चिंता लक्षात घेऊन प्रथम व्यावसायिक वाहनांवर त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर खासगी वाहनांवरही ही प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच, ड्रायव्हरच्या वर्तनाचे विश्लेषण आणि फसवणूक शोधण्यासाठी डेटा विश्लेषणाची शिफारस देखील केली आहे.