कुसगाव टोलवसुली नाका बंद करा

Close the Kusgaon toll plaza
Close the Kusgaon toll plaza
Published on
Updated on

पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी लोणावळेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : लोणावळ्यात होत असलेले वाढते अपघात रोखण्यासाठी शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी.

मात्र, त्याच वेळी ही वाहने शहरात येण्यास कारणीभूत असलेला वलवण येथील बायपासवर उभारण्यात आलेला टोलवसुली नाका सर्वप्रथम बंद करा, अशी सर्वपक्षीय मागणी लोणावळा पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीत लोणावळेकरांकडून करण्यात आली.

लोणावळा शहरातून जाणार्‍या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पक्षांच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन देऊन अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.

त्याअनुषंगाने लोणावळा पोलिस स्टेशनच्या वतीने लोणावळा नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषद, पोलिस स्टेशन, रस्ते विकास महामंडळ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आयआरबी आणि सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत उपस्थित नेत्यांनी तसेच नागरिकांना रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

लोणावळा ते खोपोली बाह्यवळण या दरम्यानच्या केवळ काही किलोमीटर अंतरासाठी वलवण येथील कुसगाव टोल नाक्यावर पूर्ण एक्स्प्रेस हायवेचा टोल वसूल केला जातो. हा टोल टाळण्यासाठी अवजड वाहणे बंदी असतानाही लोणवळा शहरातून मार्गक्रमण करतात.

त्यामुळे शहरात वाहतूक ठप्प होणे किंवा अपघातासारखे प्रकार घडतात. याशिवाय गवळीवाडा नाका या वर्दळीच्या ठिकाणी आयआरबी कंपनीने रस्त्यामध्ये लावलेले दुभाजकांचे दगड सतत निघत असतात, शिवाय त्याची उंची कमी असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असतात.

या दोन महत्त्वाच्या मुद्यांसह रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावणे, रस्त्याच्या दुतर्फा होणारी पार्किंग बंद करणे, पिकाडेल हॉटेल समोरील गाड्यांची अतिक्रमण दूर करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पी. डी. कोटक, आयआरबीचे पी. के. शिंदे, निखिल कवीश्वर, सूर्यकांत वाघमारे, कमलशील म्हस्के, बाळासाहेब फाटक, अमित गंधे, भरत चिकणे, जीवन गायकवाड, मंजू वाघ, राजू बच्चे, भरत हरपुडे, नारायण पाळेकर, दिलीप गुप्ता, बाळासाहेब पायगुडे उपस्थित होते.

सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा

पुढील 15 दिवसांत वरील मुद्यांवर काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही तर शहरात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या बैठकीत उपस्थित पदाधिकार्‍यांनी दिला.

तर दर एक महिन्याने अशाच पद्धतीची आढावा बैठक घेण्याच्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news