सांगली-सोलापूर मार्गावर टोलवसुली सुरू

सांगली-सोलापूर मार्गावर टोलवसुली सुरू
Published on
Updated on

सांगोला : पुढारी वृत्तसेवा :  रत्नागिरी-नागपूर (क्र. 166) राष्ट्रीय महामार्गावर सांगली-सोलापूर हद्दीत तीन टोलनाक्यांवर मंगळवारपासून (दि. 16 ऑगस्ट, सकाळी 8 वाजल्यापासून) टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), सोलापूर जिल्ह्यातील अनकढाळ व इंचगाव येथील तीनही टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. हलक्या चारचाकी वाहनांना प्रत्येक टोलनाक्यावर 75 रुपये, बसेसना प्रति टोलनाका 245 रुपये, तर अवजड वाहनांना 470 रुपये प्रत्येक नाक्यावर मोजावे लागणार आहेत. याचा साहजिकच प्रवासी तिकिट दरात वाढ होऊन प्रत्येक प्रवाशाच्या खिशावर भुर्दंड पडणार आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूरसह पश्‍चिम महाराष्ट्र-विदर्भ जोडणार्‍या सांगली-सोलापूर या दुहेरी मार्गामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होती. यामुळे रत्नागिरी-नागपूर महामार्गांतर्गत या रस्त्यांच्या सहापदरीकरणाचे काम करण्यात आले. ते काम गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू होते. अखेर हे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा यासाठी जोडणारा प्रमुख मार्ग आहे. यामुळे या भागातील प्रवाशांची, वाहतूकदारांची प्रवासाची वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषत: सांगली-सोलापूर हे अंतर तर रस्ता रुंदीकरणातून सुसाट वेगामुळे अवघ्या अडीच तीन तासांवर आले आहे.

हा महामार्ग झाल्याने या महामार्गाच्या शेजारच्या गावांना तालुक्याच्या ठिकाणांना, जिल्ह्याच्या ठिकाणांना प्रवाशांना जाणे -येणे सोयीचे झाले आहे. तसेच उद्योगधंद्यामधून उत्पादित झालेला कच्चा, पक्का माल, शेती मधून उत्पादित झालेला माल हा कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचणार आहे .यामुळे आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच या महामार्गावरील असणारी गावे, तालुके या ठिकाणच्या लोकांचे छोटे-मोठे उद्योग वाढीसाठी मदत होत आहे. त्यांच्या उद्योगांधंद्यामध्ये कमालीची वाढ होणार आहे. या रस्त्यांवर सांगली जिल्ह्यात बोरगाव तर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अनकढाळ तसेच इंचगाव हे दोन टोलनाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती टोलनाका व्यवस्थापनाने प्रसिद्ध केली आहे. त्याप्रमाणे 16 ऑगस्ट रात्री एक वाजल्यापासून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे.

कामे अर्धवट, तरीही टोलवसुली
अद्याप काही ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्गासह गावांना जोडणार्‍या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. घोरपडी-जुनोनीजवळ रस्त्याचे सुमारे 100 मीटरपेक्षा काम अपूर्ण असून खाचखळग्याचा रस्ता आहे. अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत, सर्व सोयी-सुविधांची पूर्तता नाही. तरीही टोलवसुली करण्यात येत असल्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

या गावांना सोसावा लागणार भुर्दंड
नाझरा टोलनाक्याच्या परिसरात वाटंबरे, अजनाळे, कमलापूर, राजूरी, उदनवाडी, पाचेगाव, झापाचीवाडी, चोपडी, नाझरे, वझरे, बलवडी, चिणके, अनकढाळ, निजामपूर, यलमार मंगेवाडी, गोडसेवाडी, केदारवाडी, अकोला, वासूद कडलास यासह वीसहून अधिक गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे 20 किलोमीटर अंतराच्या आतील आहेत. यामुळे या गावांना रोज या टोलनाक्यावरून ये-जा करावी लागत असल्याने त्या गावांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

टोल माफीची मागणी 

परिसरातील 20 किमीच्या आतील स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनांना 315 रुपयांचा मासिक पास काढावा लागणार आहे. हा पास प्रत्येक महिन्याला काढावा लागणार आहे. त्यामुळे एकदा हा नियम लागू करण्यात आला की तो कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या टोल माफीचा संदर्भ घेऊन अनकढाळ टोल नाका येथे स्थानिक चारचाकी वाहनांना टोल माफी द्यावी. अशी मागणी पुढे येत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोकांना टोलमधून माफी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनकढाळ टोलनाका प्रशासनाकडून टोल माफी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली जात आहे.

टोलनाक्याची दर सूची
कार, जीप, प्रवाशी वाहन प्रत्येक फेरीसाठी 75रुपये तर परतीच्या प्रवासासह प्रत्येक फेरीसाठी 110 रुपये, मासिक पास शुल्क 50 फेर्‍यांसाठी 2430 रुपये. जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 35 रुपये आकारणी आहे. तर हलके वाणिज्य वाहन, मीनी बस प्रत्येक फेरीसाठी 120, परतीसाठी 175, तर मासिक फेरीसाठी वैधता 3930 रुपये. जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाणिज्य वाहनांसाठी 60 रुपये. ट्रक, बस प्रत्येक फेरीसाठी 245 रुपये, परतीच्या फेरीसह 370, मासिक पास शुल्क 8230. तसेच जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 125, व्यवसायीक वाहनांसाठी प्रत्येक फेरी 270 परतीच्या प्रवासासह 405 रुपये. मासिक पास 8980 तसेच जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 135, तसेच जड व्यवसायीक वाहने प्रत्येक फेरीसाठी 385 रुपये परतीच्या प्रवासासह प्रत्येक फेरी 580, मासिक पास 12905 तसेच जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 195 रुपये. अवजड वाहने प्रत्येक फेरी 470 रुपये, परतीच्या प्रवासासह प्रत्येक फेरी 705, मासिक पास 15715. जिल्हातंर्गत मुद्रांकीत वाहनांसाठी 235 रुपये असे दर आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news