पन्‍हाळा तालुक्‍यातील सातवे पैकी शिंदेवाडीत बालिकेसह महिलेचा गॅस्ट्रोने मृत्यू | पुढारी

पन्‍हाळा तालुक्‍यातील सातवे पैकी शिंदेवाडीत बालिकेसह महिलेचा गॅस्ट्रोने मृत्यू

मोहरे : पुढारी वृत्तसेवा

सातवे पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून चार वर्षांच्या बालिकेसह महिलेचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आणखी 11 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृत बालिका आणि महिला धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील आहेत.

ग्रुप ग्रामपंचायत सातवे पैकी शिंदेवाडीला गाव विहिरीतून पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी या विहिरीजवळ आपली पाले टाकली आहेत. त्यांनी या विहिरीतील पाणी प्यायल्यामुळे तेथील लोकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या दरम्यानच गावातील काही ग्रामस्थांनाही उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर सातवे येथील आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले. ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील चारवर्षीय बालिका रितू पवार आणि राजश्री पवार (50) यांनाही त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असताना दोघींचाही मृत्यू झाला. दरम्यान, वैद्यकीय विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे.

शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनाही दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व अतिसाराचा त्रास जाणवू लागल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. शिंदेवाडी येथील ग्रामस्थ, ऊसतोड मजूर असे 11 जण सातवे आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पुष्पा कुंभार यासह संबंधित अधिकारी वर्गाने भेटी देत बोरपाडळे आरोग्य केंद्रात उपचाराच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

शिंदेवाडी येथे ऊसतोड चालू असलेल्या ठिकाणी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर व जवळच ओढ्याचा ओघळ आहे. त्यामुळे तोडणी मजूर कोणत्या ठिकाणचे पाणी प्यायले हे सांगणे कठीण आहे. तथापि बालिकेसह महिलेचा अतिसाराने मृत्यू झाला असून गावाच्या द़ृष्टीने ही दुर्दैवी व दुःखदायक घटना आहे. बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाने पाणीपुरवठा करणार्‍या टाकीची स्वच्छता, वेळोवेळी पाण्याची तपासणी, निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच गॅस्ट्रोची साथ पसरल्यापासून सातवे ग्रामपंचायत आरोग्य यंत्रणेच्या सोबत काम करून दक्षता घेतली असल्याचे सरपंच अमर दाभाडे यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button