पेपरफुटीत महेश बोटलेसह ‘न्यासा’चा सहभाग, प्रिंट केले, तेथून दलालांना पुरविल्याचे स्पष्ट

पेपरफुटीत महेश बोटलेसह ‘न्यासा’चा सहभाग, प्रिंट केले, तेथून दलालांना पुरविल्याचे स्पष्ट
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य भरतीतील गट 'क'चा पेपर फोडण्यात मुंबई आरोग्य विभागाच्या कार्यालयाचा सहसंचालक डॉ. महेश बोटले याच्यासह ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनीचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे. न्यासाने जेथे पेपर प्रिंट केले, तेथून तो दलालांना पुरविल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी दोन प्रमुख दलालांना अटक केली आहे.

निशीद रामहरी गायकवाड (वय 43, रा. शेवाळकर गार्डन, नागपूर, मूळ रा. एशियाड कॉलनी, अमरावती) आणि राहुल घनराज लिघोंट (35, रा. देवी पार्क, अमरावती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 1 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पेपर पुरविल्यानंतर आठ ते दहा लाख रुपये उमेदवारांकडून घेतल्याचे तपासात आढळले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. बोटले व न्यासा कंपनीकडून प्रश्‍नपत्रिका फुटल्याचे निष्पन्‍न झाले आहे. या गुन्ह्यातही आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बगडिरे, अंबाजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांचा समावेश असल्यामुळे त्यांना आरोपी केल्याचे पोलिस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

आरोग्य भरतीच्या गट 'ड'मधील पेपरफुटी प्रकरणातील आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये गट 'क'चा ही पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. गट 'क'चा पेपर 24 ऑक्टोबर रोजी, तर गट 'ड'ची परीक्षा 31 ऑक्टोबरला झाली होती. आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेकावकर यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास करताना हा प्रकार उघड झाला आहे. आरोग्य विभागाचा गट 'ड' वर्गाचा पेपर फोडल्याच्या आरोपावरून डॉ. बोटले, बडगिरे, डॉ. जोगदंड यांच्यासह 18 जणांना अटक केली आहे.

आरोग्य विभागाच्या 'ड' वर्ग परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेतील 100 प्रश्‍नांपैकी 92 प्रश्‍न परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणात आरोपींकडून लॅपटॉप व मोबाईल जप्त केले आहेत. या सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर पोलिसांना गट 'क'चा पेपर फोडल्याचे निष्पन्‍न झाले. या गुन्ह्यात आता अटक केलेले आरोपी गायकवाड व लिघोंट यांनी आरोग्य विभाग गट 'क' परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फोडून दलालांमार्फत पैसे घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

पाच गुन्ह्यांत 28 जणांना अटक; सहा कोटी जप्त

पुणे सायबर सेल पोलिसांनी आरोग्य विभाग, म्हाडा आणि टीईटी प्रश्‍नपत्रिका फुटीप्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 28 आरोपींना अटक करून आतापर्यंत सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील सर्वांत जास्त रोकड टीईटी गैरव्यवहार प्रकरणात जप्त केली आहे.

400 ते 500 विद्यार्थ्यांना पेपरचे वाटप

बोटलेचा पेपर सेट करणार्‍या समितीत समावेश आहे. पेपर छपाईच्या ठिकाणावरून त्याने पेपर फोडून परीक्षेपूर्वीच 400 ते 500 परीक्षार्थींना पैसे घेऊन पेपरचे वाटप केले. यासाठी काही क्लास चालकांनाही त्याने हाताशी धरले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news