

ओतूर ; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याचे खडीकरण करून मजबुतीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रोड रोलरच्या वजनदार लोखंडी चाकाखाली अवघा सहा वर्षांचा मुलगा आल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना ओतूर ते ठिकेकरवाडीच्या जुन्या रस्त्यावर घडली असून आदित्य राजेंद्र लोणकर (वय ६, रा. जुना ठिकेकरवाडी रोड, ओतूर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. (pune accident)
आदित्य हा मंगळवारी (दि. २८) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपले रहाते घरापासून जवळच्याच रस्त्यावर छोटी दुचाकी सायकल खेळत रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आला व हा गंभिर अपघात घडला.
अपघात घडल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर चालक फरार झाल्याचे समजते. रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर सध्या वर्दळ कमीच आहे.
या अपघाताची खबर मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान आदित्यच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने त्याच्या परिवाराचा सुरू असलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
त्यामुळे उपस्थित सर्वांचीच मने हेलावून गेली. अशा लहान मुलांच्या बाबत घडणारे गंभीर अपघात टाळण्यासाठी पालकांनी अधिकची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे.