ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला कोरोनाची लागण | पुढारी

ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला कोरोनाची लागण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेल्या १० वर्षीय मुलाल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, ओमायक्रॉनची धास्ती पाहता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोल्हापूर मनपा प्रशासनाने तातडीने संबंधित मुलाचे नमुने पुण्याला तपासण्यासाठी पाठवले आहेत. मात्र, या प्रकाराने मनपा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

संबंधित मुलगा आपल्या कुटुंबियांसमवेत ऑस्ट्रेलियाला गेला होता. हे संबंधित कुटुंब रमणमळा परिसरातील असून काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीय कोल्हापुरात परतले.

तत्पूर्वी, विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात संबंधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह आला. परदेशातून कोल्हापुरात आल्याने ११ डिसेंबरला त्या कुटुंबाची rt-pcr तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्या कुटुंबातील दहा वर्षाचा मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

दरम्यान, परदेशातून आला असल्याने कोणतीही रिस्क नको म्हणून महापालिका प्रशासनाने संबंधित मुलाच्या तपासणीचा अहवाल पुण्याला पाठवला आहे. तसेच त्या मुलाला खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

जोखीमग्रस्त सहा देशांतील ३० नागरिक कोल्हापुरात

ओमायक्रॉनची (Omicron) रुग्ण संख्या वाढत असलेल्या जोखीमग्रस्त देशांपैकी सहा देशांतील 30 नागरिक आतापर्यंत कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या सर्वांची कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली असून सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी सर्व देश तयारीत असताना ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला आणि त्याची संपूर्ण जगभर चर्चा सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानसेवेवर निर्बंध घालण्यात आले.

खबरदारीचा उपाय म्हणून वरील देशातील विमानांना बंदी घालण्यात आली. ज्या देशांच्या विमानसेवा सुरू ठेवण्यात आली, त्यामधील प्रवाशांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. कोल्हापुरात आतापर्यंत 375 नागरिक परदेशातून आले आहेत. त्यापैकी 225 नागरिकांचा शोध लागला आहे. त्यातील 202 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या सर्व व्यक्‍तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु, अद्याप 150 नागरिकांचा शोध लागलेला नाही. त्याचा शोध आरोग्य यंत्रणेच्या वतीने घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

परदेशातून आलेल्या 375 नागरिकांमध्ये शहरातील सर्वाधिक 191 नागरिकांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र एकही परदेशी नागरिक आला नसल्याची नोंद आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी 30 नागरिक हे जोखीमग्रस्त देशांतून आलेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 14 नागरिक सिंगापूरमधून आले आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडमचा क्रमांक लागतो.

युनायटेड किंगडममधून 8 नागरिक आले आहेत. याशिवाय नेदरलँड, ब्राझील, इटली व पॅरिसमधून आलेल्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. या 30 नागरिकांपैकी 21 नागरिक शहरातील आहेत, तर नऊ नागरिक ग्रामीण भागातील आहेत. त्यात हातकणंगले तालुक्यातील सात व करवीर आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button