कोल्हापूर : बिथरलेल्या गव्याने घेतले युवकाचे प्राण | पुढारी

कोल्हापूर : बिथरलेल्या गव्याने घेतले युवकाचे प्राण

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर परिसरात धुमाकूळ घालणार्‍या गव्याने आज (शनिवार) एका युवकाचा जीव घेतला; तर इतर दोघांना जायबंदी केले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री कोल्हापूर शहरातून वडणगेच्या दिशेने गेेलेला गवा शनिवारी एका युवकाचा काळ बनेल असे कुणालाही वाटले नव्हते.

परंतु, शनिवारी रात्री भुयेवाडी येथे स्वरूप संभाजी खोत या 19 वर्षीय युवकाला उसाच्या शेतात हल्ला करून ठार मारल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. जखमी दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रल्हाद पांडुरंग पाटील (55) आणि शुभम महादेव पाटील (20) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकाराने शिये, भुये व भुयेवाडी परिसरात अक्षरशः दहशत पसरली आहे.

कोल्हापुरातून शुक्रवारी रात्री वडणगेच्या दिशेने गेलेला गवा आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास भुयेवाडीच्या वेशीवर आला. निगवे दुमालाच्या दिशेने ओढ्यातून गवा भुयेवाडी येथील हरणघोळ परिसरात प्रल्हाद पांडुरंग पाटील यांच्या गुर्‍हाळघराजवळ आला. या परिसरात पाटील यांची जनावरे आहेत. त्यांच्या दिशेने जाणारा गवा पाहून पाटील यांनी धाव घेत त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराने बिथरलेल्या गव्याने थेट पाटील यांच्या दिशेने धाव घेतली. गव्याने पाटील यांना घुसळून टाकले. गव्याचे शिंग पाटील यांच्या मांडीत घुसले. छातीला आणि डाव्या खांद्याला जबर दुखापत करून गवा गुर्‍हाळघराशेजारी असलेल्या हरणेश्‍वर नगर परिसरातील लक्ष्मण पाटील यांच्या उसाच्या शेतात घुसला.

‘गव्याच्या हल्ल्यात एकजण जखमी झाला. गावात गवा घुसला’, ही बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली. याच दरम्यान वन विभाग आणि पोलिसांनी ‘गावात गवा आला आहे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये’, अशी दवंडी दिली. त्याचवेळी गावात आलेला गवा वारणा बझारशेजारील शेतात दिसला. त्यावर टॉर्चचा प्रकाशझोत पाडून गव्याचे चित्रीकरणही केले. ते व्हायरल चित्रीकरण पाहून गवा पाहण्यासाठी अनेक तरुणांनी हरणेश्‍वर नगरच्या दिशेने धाव घेतली.

गव्याला पाहण्यासाठी आणि त्याला हुसकावण्यासाठी तरुणांची फौजच त्याच्या मागे लागली. यावेळी गवा उसाच्या शेतात होता, तो दिसतही नव्हता. तरीही काही अतिउत्साही तरुणांनी शेताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अचानक सुरू झालेला गोंगाट, आरडाओरड यामुळे गवा बिथरला. या बिथरलेल्या गव्याने आपला मोर्चा 19 वर्षाच्या स्वरूपकडे वळविला. संतप्‍त गव्याचा रोख लक्षात येताच अनेकांनी धूम ठोकली आणि सैरावैरा पळू लागले. मात्र स्वरूपला शेतातून बाहेर पडता आले नाही. तो वळत असतानाच गव्याने त्याला गाठत आपले शिंग त्याच्या डाव्या बाजूच्या बरगडीजवळ घुसवत वर उचलून आपटले. याचवेळी जीवाच्या आकांताने पळताना तळ्यावरचा शुभम महादेव पाटील हा सुद्धा गव्याच्या तावडीत सापडला. गव्याने त्यालाही ठोकरले. त्यात तो जखमी झाला.

गव्याच्या एका धडकेतच खाली पडलेला स्वरूप निपचिप पडला. धडक देऊन गवा पुन्हा शेतात माघारी फिरला. दरम्यान आरडाओरड गोंधळ सुरूच होता. काही वेळ तरूण, ग्रामस्थ शेताबाहेरून गव्याला हूसकावतच होते. याच दरम्यान सुमारे 15-20 मिनिटांनी सर्वांच्याच मनात धडकी भरवणारा एक मोबाईल मॅसेज आला. ऊसाच्या शेतात जखमी अवस्थेत पडलेल्या शुभम पाटीलने ‘आपण गव्याच्या धडकेत जखमी झालो आहे, मी शेतात पडलो आहे’, असा हा मॅसेज होता. एका मित्राच्या मोबाईलवर आलेला हा मॅसेज पाहून सारेच हबकले. सावधगिरी बाळगत सर्वजण शेतात घुसले.

जखमी शुभमला तरूणांनी उचलून घेतले. ते त्याला घेऊन बाहेर येत असतानाच एकाने शेतात टॉर्चचा प्रकाशझोत टाकला आणि सार्‍यांच्याच काळजात धस्स झाले. काही वेळापूर्वी त्यांच्या सोबत हसत खेळत गवा हुसकावण्यासाठी पुढे करणारा स्वरूप उसाच्या पाल्यात निपचित पडला होता. काहींनी त्याला हाक मारली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यालाही तातडीने उचलून बाहेर आणले. मात्र स्वरुप जागेवरच गतप्राण झाला असावा. कारण सीपीआरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, गव्याने धडक दिल्याचे समजताच परिसरात आणखी गर्दी वाढली. प्रल्हाद पाटीलला पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुभम पाटीललाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, स्वरूपला सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सीपीआर आवारात भुयेवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थ, मित्र, नातेवाईक मोठ्या संख्येने आले. काही वेळात सीपीआर परिसरात प्रचंड गर्दी झाली. दरम्यान, स्वरूप पाटील याचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच वातावरण अधिकच धीरगंभीर झाले. गव्याच्या हल्याची माहिती मिळताच कोल्हापूरचे उपवनसरंक्षक आर. आर. काळे चार अधिकार्‍यांसह सीपीआरमध्ये आले. त्यांनी उपस्थितांकडून घटनेची माहिती घेतली.

स्वरूप हा भुयेवाडीच्या माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा मुलगा होता. तो महावीर महाविद्यालयात बारावीत शिकत होता. त्याच्या मागे विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, स्वरूपचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच भुयेवाडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली. त्याच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

कोल्हापुरात शांत; गावात बिथरला

कोल्हापुरात दिवसभर रस्त्या कडेला हा गवा शांत बसून होता. तो बिथरणार नाही, आक्रमक होणार नाही, याची दक्षता वन विभाग आणि पोलिस तसेच आपत्ती व्यवस्थापनाने घेतली होती. ठिकठिकाणी स्वंयसेवक, पोलिस, वनविभागाचे जवान तैनात होते. सायंकाळ झाल्यानंतर त्याच्या नेहमीच्या पद्धतीने गवा तेथून मार्गस्थ झाला.

पंचगंगा नदी पोहून तो शिवाजी पुलाशेजारून वडणगे हद्दीत गेला. तेथून तो राजाराम बंधार्‍याच्या बाजूने पुढे निगवे परिसरात गेला. सकाळ होताच गव्याने त्या परिसरात ठाण मांडले. गवा नैसर्गिक अधिवासाकडे जात असताना, त्याला अडथळा नको म्हणून या परिसरातील गर्दीही कमी झाली. शनिवारी सायंकाळनंतर गवा निगवे दुमालाच्या दिशेने मार्गस्थ झाला. भुयेवाडीत आल्यानंतर मात्र, नागरिकांच्या गोंधळाने तो बिथरला. परिणामी एका तरुणाच्या जीवावर बेतले.

अरे, मला गव्याने मारले आहे..

प्रल्हाद पाटील यांच्यावर गव्याने हल्‍ला करून जखमी केले होते. त्यांच्यापासून सुमारे तीस फूट अंतरावर उसाच्या शेतात स्वरूप आणि शुभम पडले होते. ते कोणाच्या लक्षात येत नव्हते. पायवाटेने जाणार्‍या लोकांना ‘मला गव्याने मारले आहे’, असे शुभम ओरडून सांगत होता. त्यानंतर त्याने मोबाईलवर संदेश पाठवला. त्यानंतर मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने त्यांचा शोध घेतला असता उसाच्या फडात ते आढळून आले.

जोतिबा भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी सावध राहावे

भुयेवाडीतून गवा गिरोलीच्या दिशेने जोतिबाच्या पूर्व बाजूला पुढे गेल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवार असल्याने जोतिबावर जाणार्‍या भाविकांची मोठी गर्दी असते. अनेक भाविक पायी चालत जातात. या सर्व भाविकांनी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

साहेब, एक माणूस गेला… आणखी किती जाण्याची वाट बघताय?

गवा शुक्रवारी कोल्हापूर शहरात आला होता. त्यावेळी वनविभागाने काय केले? त्याला बेशुद्ध करून त्याच्या अधिवासात का सोडले नाही, असा संतप्‍त सवाल करीत भुयेवाडी (ता. करवीर) येथील गावकर्‍यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. ‘साहेब, एक माणूस गेला आहे. आणखी किती जाण्याची वाट बघत आहात. तत्काळ याबाबत अ‍ॅक्शन घ्या’, अशी मागणी केली. दरम्यान, उपवनसंरक्षक अधिकारी आर. आर. काळे यांच्या टीमने शनिवारी रात्री 11.30च्या दरम्यान सीपीआर रुग्णालयात जाऊन मृत आणि जखमींची माहिती घेतली. जखमींच्या उपचाराचा खर्च वनविभाग करणार आहे.

वन विभागाचे गव्याच्या हलचालींवर लक्ष

गेले दोन दिवस गवा कोल्हापूरसह परिसरामध्ये फिरत आहे. त्यामुळे तो थकला आहे. भुये परिसरामध्ये वनविभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. हल्‍ला झालेल्या शेतात वन विभागाची टीम पाहणी करत आहे. आणखी कोणावर हल्‍ला झाला आहे का याचा शोध घेतला जात आहे. तसेच एक टीम गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्याला सुरक्षित ठिकाणी हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button