कोल्हापूर : गेला गवा कुणीकडे? | पुढारी

कोल्हापूर : गेला गवा कुणीकडे?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : भुयेवाडी परिसरात शनिवारी रात्री तिघांवर हल्ला करणार्‍या गव्याचा रविवारी दिवसभर शोध घेतला जात होता. सादळे-मादळे, गिरोली, पोहाळे आदी परिसरात शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. यामुळे ‘गेला गवा कुणीकडे’, अशी म्हणण्याची वेळ आली.

कोल्हापूर सह भुयेवाडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून गव्याचा धुमाकूळ सुरू आहे. गर्दी आणि गोंगाटाने बिथरलेल्या गव्याने भुयेवाडीत तिघांवर हल्ला केला. त्यात स्वरूप संभाजी खोत हा 19 वर्षीय युवक ठार झाला; तर दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, हल्ला झाल्यानंतर गवा भुयेवाडी पसिरातून सादळे-मादळेच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे काहींनी सांगितले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर वन विभागाने आज सकाळी नऊ वाजल्यापासून सादळे-मादळे, गिरोली, पोहाळे आदी परिसरात शोध मोहीम राबविली. या मोहिमेसाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. गव्याच्या पायाचे ठसे, विष्ठा आदींसह प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा मार्ग शोधला जात होता. गायमुख परिसराजवळ आज सकाळी गव्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या परिसरात गव्याचा वावर असल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. दिवसभर सुरू असलेली ही मोहीम सायंकाळी पाचनंतर थांबवण्यात आली.

भुयेवाडीतून पुढे मार्गस्थ झालेला गवा नेमक्या कोणत्या दिशेला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बहुतांशी वेळा दिवसभर विश्रांती घेऊन सायंकाळनंतर गवा मार्गक्रमण करत असतो.

यामुळे दिवसभर एकाच ठिकाणी थांबलेला हा गवा रात्री मार्गक्रमण करेल, अशी शक्यता आहे. गव्याच्या वावराबाबत माहिती मिळल्यास वन विभागाशी अथवा प्रशासनाशी संपर्क साधावा. गर्दी, गोंगाट करू नये, गवा असलेल्या बाजूला जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलिसपाटलांना दक्षतेच्या सूचना

सादळे-मादळे परिसरातील सर्व गावातील पोलिसपाटलांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावागावांत नागरिकांची जनजागृती करा, गव्याचा वावर आढळून आल्यास तत्काळ वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकासह वन विभागाचे अधिकारी, पोलिस, स्थानिक प्रशासनाला माहिती द्या, गव्याचा वावर असणार्‍या परिसरात नागरिक फिरणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

सोमवारीही शोध मोहीम राबविणार

वन विभागाने तीन पथकाद्वारे आज दिवसभर शोध मोहीम राबविली. गव्याचा वावर आढळला नाही. सायंकाळनंतर शोध मोहीम थांबवली असली तरी वन विभागाचे कर्मचारी परिसरातच ठाण मांडून आहेत. गवा पुन्हा नागरी वस्तीत येणार नाही, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गवा सादळे-मादळे परिसरातील जंगलात असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उद्या सोमवारीही शोध मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

एकाची प्रकृती गंभीर

गव्याने धडक दिल्याने जखमी झालेल्या भुयेवाडी येथील दोघांपैकी शुभम महादेव पाटील (वय 20) याच्यावर निगवे येेथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्याला

रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. प्रल्हाद पांडुरंग पाटील (वय 55) यांना पेठवडगाव येथील रुग्णालयातून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून उद्या त्यांच्यावर आणखी दोन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

Back to top button