कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात विरोधक एकवटताहेत! महाविकास आघाडी अभेद्य ठेवण्याचे आव्हान | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात विरोधक एकवटताहेत! महाविकास आघाडी अभेद्य ठेवण्याचे आव्हान

कोल्हापूर : संतोष पाटील

वडगाव कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपसह घटक पक्षांनी राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरे-महाडिक-आवाडे-शेट्टी-यड्रावकर-हाळवणकर हे गट राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र आले आहेत.

जिल्ह्याचे राजकारण पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीकडे झुकत असतानाच वडगाव बाजार समितीच्या निमित्ताने विरोधकांनी महाविकास आघाडीतील मंत्री यड्रावकर यांना सोबत घेत मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पूर्वी वारणा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोरे आणि महाडिक यांच्यात राजकीय वितुष्ट आले होते. महापालिकेतून महाडिक गटाची सत्ता संपवण्यासाठी कोरे यांनी टोकाचा संघर्ष केला. गोकुळ दूध संघात महाडिक विरोधी भूमिका घेतली. बदलत्या राजकीय घडामोडींत विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप आघाडी म्हणून कोरे यांनी महाडिक गटासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे यांच्या संवादाचा सेतू कामी आला. आता पुन्हा जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यात आ. कोरे हेच केंद्रस्थानी आहेत.

वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला राजकीय ताकद दाखवत इतर पक्ष आणि आघाडीचे नेते एकत्र आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात संस्थात्मक राजकारण करत असताना ते सर्वसमावेशक नसेल, तर आम्हास गृहित धरू नका, असे संकेतच मंत्री यड्रावकर, शेट्टी यांच्यासह भाजप आघाडीने दिल्याचे जाणकारांचे मत आहे.

प्रत्येक संस्थेच्या निवडणुकीतील आडाखे आणि गणिते वेगळी असतात. एकच सूत्र सर्व निवडणुकांत असू शकत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला इतर पक्षीयांनी राजकीय ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. वडगाव बाजार समिती हे निमित्त आहे. बाजार समितीच्या निमित्ताने आपणास सर्व पर्याय खुले असल्याचेच संकेत घटक पक्षांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणाचा बाज एकाच बाजूला झुकू दिला जाणार नाही. सर्वांचे मत आणि मोल जाणूनच जिल्ह्याच्या कारभार्‍यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. आताच्या बेरजेच्या राजकारणाचे पडसाद केडीसीसीसह जिल्ह्यातील राजकारणावर उमटणार आहेत.

विरोधकांचा दबाव गट

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकीय ताकद वाढवत संस्थात्मक निवडणुकात बाजी मारत आहेत. गोकुळ आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात हा प्रयोग यशस्वी झाला. जिल्हा बँकेत मात्र भाजपसह कोरे-महाडिक-आवाडे यांनी दबाव गट कायम ठेवला आहे. सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर लढण्याची ताकद असल्याचे संकेत या नेत्यांनी दिले आहेत.

हेही वाचा

Back to top button