social media trap : कोल्हापूर : मुलींनो, रोडरोमिओंपासून सावधान! | पुढारी

social media trap : कोल्हापूर : मुलींनो, रोडरोमिओंपासून सावधान!

कोल्हापूर/दानोळी ः पुढारी वृत्तसेवा : social media trap : सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करायचा… गोड गोड बोलायचे…आणि अल्पवयीन शाळकरी मुलींना आपल्या जाळ्यात ओढायच…त्यानंतर जमेल तसं पैसे, दागिने त्यांच्याकडून काढून घ्यायचे… असे प्रकार जिल्ह्यात सर्रास घडत आहेत. यात अल्पवयीन मुलींचे जीवन उद्ध्वस्त होत असून, पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे एका चौदा वर्षीय मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केली जात होती; पण पालक आणि पोलिसांच्या जागरुकतेमुळे पुढील अनर्थ टळला. दानोळीत घटलेले असे प्रकार गावोगावी घडत आहेत.

दिलासादायक बदल

social media trap : व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरद्वारे गोलमाल

व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांचा सराईतपणे वापर मुले करत आहेत. याचा फायदा घेऊन काही तरुण इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत.

पालकांची जबाबदारी महत्त्वाची

पालकांनी आपल्या मुला—मुलींचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? त्यांचा शाळेतील वावर कसा आहे? याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या पाल्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून त्यांना चांगल्या वाईट प्रसंगी पाठबळ देण्याची, त्यांना आधार देण्याची गरज आहे. पालक जर सजग झाले तर फसवणुकीच्या या प्रकारांना नक्‍कीच आळा बसेल.

सहा वर्षांत 990 अल्पवयीन मुली बेपत्ता

गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून 129 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची पोलिस दफ्तरी नोंद झाली आहे. त्यापैकी पोलिसांनी 103 मुलींना शोधून काढले आहे. 2015 ते 2020 या सहा वर्षांच्या काळात 990 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. यात 990 बेपत्ता मुलींपैकी 915 मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अद्याप 75 मुलींचा शोध सुरू आहे.

समुपदेशनाची गरज

मुले – मुली जेव्हा वयात येतात, मोठी होत असतात तेव्हा त्यांचे समुपदेशन करणे खूप गरजेचे आहे. मुले – मुली अनेकदा आपल्या आसपास वावरणार्‍या लोकांचे अथवा टीव्ही, सिनेमातील प्रसंगांचे अनुकरण करत असतात.

मात्र, त्यामुळे भविष्यातील धोक्याची त्यांना पुसटशीही कल्पना नसते. अनेकदा ही मुले ब्लॅकमेलला बळी पडतात. त्यांची आर्थिक फसवणूक होते. अनेकदा त्यांचे शरीरिक शोषणही केले जाते. त्यामुळे मुला-मुलींचे तसेच पालकांचेही समुपदेशन गरजेचे आहे.

सोशल मीडियाचे मायाजाल!

सोशल मीडियाच्या माध्यमातून किती मुली अशा भूलथापांना बळी पडल्या. किती मुलींची आर्थिक फसवणूक झाली आहे. याची माहिती घेतल्यास हा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतीत पालकांनी ही जागृत होणे गरजेचे झाले आहे. आपली पाल्या कोणाच्या संपर्कात आहे. अभ्यासाच्या नावाखाली आपली मुले व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांच्या वापरातून वाईट संगतीत तर जात नाहीत ना याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Back to top button