कोल्हापूर : समझोत्याच्या राजकारणात काँग्रेस ‘सरस’ | पुढारी

कोल्हापूर : समझोत्याच्या राजकारणात काँग्रेस ‘सरस’

कोल्हापूर : सतीश सरीकर  ; कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक या पारंपरिक कट्टर विरोधकांत इर्ष्येची लढाई सुरू होती. शह-काटशहामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते.

राजकीय वर्चस्वासाठी प्रचंड टोकाचे राजकारण सुरू होते. अनपेक्षितपणे घडलेल्या घडामोडीत भाजपने शुक्रवारी माघार घेतली. काँग्रेसच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. राज्यस्तरावर भाजप-काँग्रेसची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाली. समझोत्याच्या राजकारणात कोल्हापुरात काँग्रेस सरस ठरली. एखाद्या निवडणुकीत महाडिकांनी पहिल्यांदाच माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परिणामी, सतेज पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा निर्माण झाला आहे.

काही वर्षांपूर्वी सतेज पाटील व महाडिक हे राजकारणात एकत्र होते. पाटील व धनंजय महाडिक यांच्यात मैत्री होती. साधारण 2004-05 पर्यंत ही स्थिती होती. परंतु, राजकीय इच्छा-आकांक्षा रूंदावत गेल्याने त्यांच्यात दुफळी निर्माण झाली. 1999 मध्ये सतेज पाटील यांनी काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. परंतु, काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही.

2004 मध्ये महाडिक यांनी शिवसेनेतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. 2004 मध्ये सतेज पाटील पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्धार केला. राष्ट्रवादीचे उमेदवार व तत्कालीन मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पाटील यांनी पराभव केला. 2009 मध्ये एकेकाळचे मित्र असलेले सतेज पाटील (काँग्रेस) व धनंजय महाडिक (अपक्ष) यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी रणांगण पेटले. अखेर पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर मात्र पाटील व महाडिक यांच्यातील वैर टोकाला गेले.

2014 मध्ये महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असूनही सतेज पाटील यांनी महाडिकांचा प्रचार करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करून दोघांना एकत्र आणले. महाडिक व पाटील यांनी एकत्र प्रचारही केला. महाडिक निवडून आल्यानंतर दोघांत आरोप-प्रत्यारोप झाले. पुन्हा दुरावा निर्माण झाला. आता तो इतका टोकाला गेला आहे की कोणत्याही स्थितीत पाटील व महाडिक एकत्र येऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे.

एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व गाजविणार्‍या महाडिक यांच्या ताब्यातून पाटील यांनी एकेक करत सर्व संस्था काढून घेतल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ पाटील यांना मिळत.

आहे. गोकुळ दूध संघावरही काँग्रेस-राष्ट्रवादीची म्हणजेच सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. केडीसी बँक राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक संस्थांवर वर्चस्व आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आता राजाराम साखर कारखाना वगळता राजकीय वर्चस्व गाजविता येईल, अशी एकही संस्था किंवा पद नाही.

Back to top button