कोल्हापूर : भास्कर टोळीला ‘मोका’ | पुढारी

कोल्हापूर : भास्कर टोळीला ‘मोका’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मारामारी, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा स्वरूपाचे 48 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भास्कर डॉन टोळीच्या पाचजणांवर ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली.

अमोल महादेव भास्कर व टोळीने गेल्या काही वर्षांत खासगी सावकारीसह भूखंड बळकावण्याचे उद्योग चालवले होते. काही दिवसांपूर्वीच या परिसरातील आर.सी. गँगवरही ‘मोकां’तर्गत कारवाई झाली आहे. एका वर्षात सहा ‘मोका’ कारवायांना मंजुरी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमोल महादेव भास्कर (वय 38), महादेव शामराव भास्कर (61), अमित ऊर्फ पिंटू महादेव भास्कर (33), शंकर शामराव भास्कर (53), संकेत सुदेश व्हटकर (22, सर्व रा. जवाहरनगर) अशी ‘मोकां’तर्गत कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत. एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने 1999 साली जवाहरनगरात 369.37 चौ.मी. प्लॉट खरेदी केला होता.

याची सध्या बाजारभावाप्रमाणे 80 ते 90 लाख रुपये किंमत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये येथील कुलूप तोडून प्लॉट जबरदस्ती काढून घेण्यासाठी त्यांना डांबून ठेवण्यात आले. जबरदस्तीने स्टॅम्पवर सही घेण्याचा प्रयत्न भास्कर टोळीने केला होता. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

या तपासात पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी ‘मोका’ अधिनियमाच्या वाढीव कलमांचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास जयसिंगपूरचे उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

52 गुन्हेगारांवर ‘मोका’ कारवाई

2020 ते आजअखेर ‘मोकां’तर्गत 7 गुन्ह्यांत 52 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली आहे. अवैध व्यवसाय व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी कायदेशीर कारवाईसह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
गुन्हेगारांविरोधात तक्रारी द्या: जिल्हा

पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे

अमोल महादेव भास्कर व त्याची भास्कर डॉन गँग या संघटित गुन्हेगारी संघटनेने चालविलेल्या बेकायदेशीर खासगी सावकारी, दहशतीच्या जोरावर भूखंड गिळंकृत केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्यांच्या अत्याचारास बळी पडलेल्यांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.

2021 मध्ये केलेल्या ‘मोका’ कारवाया (कंसात संशयित संख्या)

राजारामपुरी : साईराज जाधव व साथीदार (13)
शिवाजीनगर : विकास ऊर्फ विक्या खंडेलवाल व साथीदार (4)
जुना राजवाडा : रवी सुरेश शिंदे व साथीदार (10)
शाहूपुरी : ऋत्विक अमर सूर्यवंशी व साथीदार (6)
शिवाजीनगर : सुदर्शन शिवाजी बाबर व साथीदार (8)
राजारामपुरी : अमोल महादेव भास्कर व साथीदार (5)

मदत करणार्‍यांची गय नाही

भास्कर टोळीतील काही सदस्यांना खाकीमध्ये फिरणार्‍या काही झारीतील शुक्राचार्यांची मदत मिळत होती, असा आरोप होत आहे. दरम्यान, असा कोणताही प्रकार तपासात पुढे आल्यास संबंधितांवर कारवाई करू, असेही पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : एसटी कर्मचाऱ्यांचे आदिवासी नृत्य…!

Back to top button