पृथ्वीच्या सुरक्षेसाठी ‘नासा’ने सुरू केली ‘डार्ट’ मोहीम | पुढारी

पृथ्वीच्या सुरक्षेसाठी ‘नासा’ने सुरू केली ‘डार्ट’ मोहीम

वॉशिंग्टन : ‘नासा’ने बुधवारी अवघ्या पृथ्वीच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने अनोखी ‘डार्ट’ मोहीम सुरू केली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 वाजता डार्ट यानाचे कॅलिफोर्नियाच्या स्पेस फोर्स बेसवरून प्रक्षेपण करण्यात आले. हे यान दोन लघुग्रहांचा समूह असलेल्या ‘डिडिमोस’वर (म्हणजेच त्याच्याभोवती फिरणार्‍या ‘डिमोर्फस’वर) आदळवले जाईल. यामुळे लघुग्रहाची दिशा व गती बदलते का हे पाहण्यात येणार आहे. भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या धोकादायक लघुग्रहांची धडक टाळण्यासाठी त्यांची दिशा बदलते येते का हे यामधून पाहिले जाईल.

‘नासा’ने या मोहिमेला ‘डार्ट’ (डबल अ‍ॅस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट) असे नाव दिले आहे. या मोहिमेसाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. यानाच्या लघुग्रहाला होणार्‍या धडकेनंतर एखाद्या लघुग्रहाची दिशा व गती किती प्रमाणात बदलता येऊ शकते हे यामधून पाहिले जाईल. ‘डिडिमोस’ हा दोन भागांचा लघुग्रह आहे.

त्याचा मोठा भाग सुमारे 780 मीटर आकाराचा असून त्यालाच ‘डिडिमोस’ म्हटले जाते तर लहान भाग सुमारे 160 मीटरचा असून त्याला ‘डिमोर्फस’ असे म्हटले जाते. हा डिमोर्फस एखाद्या चंद्राप्रमाणे डिडिमोसभोवती प्रदक्षिणा घालतो. अर्थात डिडिमोस कधीही पृथ्वीला धडकण्याची शक्यता नसली तरी केवळ संशोधनासाठी, निरीक्षणासाठी त्याच्यावर यानाची ही धडक घडवून आणली जाणार आहे. विशेष म्हणजे 2003 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला होता आणि 2022 मध्ये तो पुन्हा पृथ्वीजवळून जाणार आहे. त्याचा शोध 1996 मध्ये लावण्यात आला होता.

लघुग्रहाला कसे धडकणार यान?

या मोहिमेचा प्रमुख भाग आहे एक इम्पॅक्टर. हा इम्पॅक्टर ‘डिडिमोस’ लघुग्रहाच्या ‘डिमोर्फस’ या छोट्या भागावर आदळवला जाईल. त्यावेळी त्याचा वेग ताशी सुमारे 23,760 किलोमीटर इतका असेल. या धडकेमुळे डिमोर्फसच्या वेगात सुमारे 1 टक्क्याची घट होईल आणि त्याच्या कक्षेतही बदल होईल. या मोहिमेचा एक हिस्सा सेकंडरी स्पेसक्राफ्टचाही आहे. तो इटालियन स्पेस एजन्सीने बनवला आहे. त्याला ‘एलआयसीआयएक्यूब’ असे नाव आहे. हे सेकंडरी स्पेसक्राफ्ट धडकेच्या दोन दिवस आधी मुख्य यानापासून वेगळे होईल. ते धडकेचे फोटो आणि अन्य नोंदी पृथ्वीकडे पाठवेल. त्यामुळे या मोहिमेविषयीचे अपडेटस् संशोधकांना मिळत राहतील.

Back to top button