कोल्हापूर विधान परिषद निवडणूक दुरंगी, सतेज पाटील-अमल महाडिक यांच्यात लढत | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक दुरंगी, सतेज पाटील-अमल महाडिक यांच्यात लढत

कोल्हापूर : पुढारी वृृत्तसेवा

विधान परिषदेची कोल्हापूर मतदारसंघाची निवडणूक दुरंगी होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्यात लढत होणार आहे .बुधवारी झालेल्या छाननीत पाचपैकी चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यापैकी दोन अर्ज डमी उमेदवारांचे असून, ते माघारी घेतले जाणार आहेत. अपक्ष उमेदवार संजय मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा विधी अधिकारी वैभव इनामदार आदींच्या उपस्थितीत छाननीला प्रारंभ झाला. पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक, अपक्ष उमेदवार शौमिका महाडिक आणि शशिकांत खोत यांचे अर्ज वैध ठरले. शौमिका महाडिक आणि शशिकांत खोत यांचे अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. यामुळे पाटील आणि महाडिक यांच्यात निवडणुकीचा थेट सामना रंगणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्जांत सूचकांच्या बनावट सह्या केल्याचे स्पष्ट झाल्याने अपक्ष उमेदवार संजय मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. मागाडे यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याबद्दल पाच नगरसेवकांनी मंगळवारी हरकत घेतली होती. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आणि सह्यांचे नमुने संबंधित नगरसेवकांनी सादर केले होते.

दरम्यान, आजच्या छाननीवेळी उमेदवार मागाडे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांचे कोणतेही म्हणणे न आल्याने त्यांचा अर्ज रेखावार यांनी अवैध ठरवला. संबंधित नगरसेवकांनी यापूर्वीच पोलिसांकडे याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. त्याचा तपास होईल, प्रसंगी गुन्हा दाखल होईल. यामुळे निवडणूक कार्यालयाकडून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचा सध्या निर्णय घेण्यात आला नसल्याचे रेखावार यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button