बिद्री; पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखाना निवडणुकीत पहिल्या फेरीत राधानगरीची ५१ गावे, कागलमधील ४८ गावे व भुदरगडमधील २१ गावातील मतमोजणीस प्रारंभ झाला. १२० टेबलवर मतमोजणीती सुरू आहे. दरम्यान, अनेक मतपेट्यांमधून दोन्ही आघाडीच्या नेत्यांची कान उघाडणी करणार्या चिठ्ठ्यांचा पाऊस पडला आहे. मतदारांनी चिट्यांमधून नेत्यांना चांगलच सुनावलं आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रथी-महारथी उतरल्यामुळे अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. प्रथम एकतर्फी वाटणारी निवडणूक राजकीय उलथापालथीमुळे अॅक्शन मोडवर आल्याने या निकालाकडे कार्यक्षेत्राबरोबर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत विमान सुसाट असल्याचे चित्र आहे. राधानगरीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी सत्ताधाऱ्यांचे 'विमान' चिन्ह सुसाट असल्याचे दिसते. कागल मधील ४८ गावात व भुदरगडमधील २१ गावात सत्ताधारी गटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, सर्वच चिठ्या निवडणूक विभागाने एकत्र करीत माध्यमांपासून दूर ठेवल्या आहेत. चिठ्यांमध्ये अर्वाच्य भाषा असल्यामुळे एका पिशवीत या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत.
मतमोजणीची पहिली फेरी ३ वाजता संपल्यानंतर सव्वा तीन वाजता पहिल्या फेरीतील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी जाहीर केला. पहिल्या फेरीत ३५ हजार ४८९ मते मोजण्यात आली. त्यातील ३४ हजार ७३६ वैध मते ठरली. पहिल्या फेरीत ७५३ मते अवैध झाली. राधानगरी गट क्रमांक एकमधून सत्ताधारी आघाडीने २८९९ मतांची आघाडी घेतली.
साडेतीन वाजता दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला भुदरगड तालुक्यातील ४२ गावे व करवीर तालुक्यातील २१ गावांची मत मोजणी सुरु झाली आहे.
हेही वाचा