गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या महालक्ष्मी आघाडीचा विजय विक्रमी मताधिक्याने विजय होणार असून हा विजय सभासदांचा असल्याची प्रतिक्रिया चेअरमन के. पी. पाटील यांनी दैनिक 'पुढारी'शी मतमोजणी केंद्रात बोलताना व्यक्त केली.
आज (दि. ५) दुपारी २.३० वा. सुमारास चेअरमन के. पी. पाटील गुलालात रंगून मतमोजणी केंद्रात दाखल झाले. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून के. पी. पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी उमेदवार राहुल देसाई, सत्यजित जाधव, पंडितराव केणे, मधुकर देसाई, धनाजीराव देसाई, उमेश भोईटे, रावसाहेब खिल्लारी, राजेंद्र मोरे, रणजीत पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित बातम्या
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ५) सकाळी सुरू झाली. आतापर्यंत आलेल्या कलानुसार सत्ताधारी गटाचे नेते व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १६०० मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. १२० केंद्रावर मतमोजणी झाली असून आतापर्यंत ३४ हजार ४८९ मतांची मोजणी झाली आहे. त्यात सत्ताधारी गटाला ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी गटाला मोठी आघाडी मिळताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. सत्ताधारी गटाने १२० टेबलावरील आकडेवारी मतांचा वरचष्मा ठेवला. राधानगरीतून ए. वाय. पाटील यांनी काही गावात फारसे मताधिक्य घेता आले नाही. त्यामुळे सत्ताधारी गट आघाडीवर राहिला. कल लक्षात येताच ए. वाय. पाटील यांनी केंद्रावरून काढता पाय घेतला.