कोल्हापुरात ‘वजन’दार उमेदवार… मतदार राजा खूश..! | पुढारी

कोल्हापुरात ‘वजन’दार उमेदवार... मतदार राजा खूश..!

कोल्हापूर; संतोष पाटील

विधान परिषदेच्या निवडणुकीत मर्यादित मतदार संख्या असल्याने कोणाच्या वाट्याला किती ‘प्रसाद’ मिळणार याची खुमासदार चर्चा जोरात सुरू आहे. आता पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक या दोन आर्थिकद़ृष्ट्या सक्षम असलेल्या ‘वजन’दार उमेदवारांत लढत होणार असल्याने मतदार मात्र खुशीत आहेत. बंद खोलीतील चर्चा आणि पडद्यामागील वाटाघाटीत आर्थिक आणि राजकीय ‘किंमत’ जोखण्यात नेते आणि उमेदवारांसह त्यांचे पाठीराखे व्यस्त झाले आहेत.

दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे निवडणुकीचे बाह्यरंग ढवळून निघत आहे; तर पाठिंबा आणि प्रत्यक्ष मतदानासाठी होत असलेल्या जोडण्यामुळे अंतरंगात मात्र वेगळीच हलचल सुरू आहे. नेत्यांवरील निष्ठा आणि पक्षीय बंधनात अडकलेल्या मतदारांना राजकीय किंमत मोजावी लागेल की काय, याची भीती सतावत आहे.

आघाड्यांच्या बंधनात असलेल्या मतदार ठरणार्‍या आकड्याकडे लक्ष ठेवून आहेत. अपक्ष आणि सर्व बंधने झुगारून परिघाबाहेर वाटचाल करणार्‍या मतदारांची मात्र या लक्षवेधी लढतीत किंमत वाढणार आहे.टोकाच्या राजकीय ईर्ष्येमुळे या लढतीतून इच्छापूर्ती होईल, या आशेने मतदार सुखावला आहे.

फौज मैदानात तैनात..!

मतदारांसह तालुक्याचे नेते, गट आणि आघाड्यांचे नेते, प्रमुख राजकीय मंडळी यांची ‘विशेष’ मर्जी उमेदवारांकडून राखली जाणार आहे. यासाठीची तजवीज आणि जोडण्या घातल्या जात आहेत. तालुका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वैयक्तिक असे मतदारांचे गट करून संपर्क प्रमुखांची फौज दोन्ही बाजूंनी मैदानात उतरली आहे. प्राथमिक चर्चेनंतर ‘खास’ कार्यकर्ते ठरलेली तजवीज पूर्ण करण्यासाठी झटताना दिसत आहेत. वाटाघाटीच्या खर्‍या खोट्या वावड्यांमुळे कोणाला किती मिळाले, उमेदवारांना निवडणूक कितीला पडेल, या आकडेमोडीची चर्चा मात्र सर्वदूर सुरू आहे.

हेही वाचलत का?

Back to top button