Kolhapur News | श्रद्धा पाटील : ‘ही’ आहे शाहूवाडीची ‘मेरी कोम’, जिद्द, चिकाटीच्या जोरावर बॉक्सिंगमध्ये घेतली मोठी झेप | पुढारी

Kolhapur News | श्रद्धा पाटील : 'ही' आहे शाहूवाडीची 'मेरी कोम', जिद्द, चिकाटीच्या जोरावर बॉक्सिंगमध्ये घेतली मोठी झेप

विशाळगड; सुभाष पाटील : घरची परिस्थिती बेताची… भारतीय सैन्य दलात अथवा पोलीसात जाण्याची तीव्र इच्छा… कबड्डी, खो-खो खेळाची आवड… मात्र बॉक्सिंग खेळात कोणताही गंध नसताना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कॉलेज शिक्षकांच्या मार्गदशनाखाली राज्यस्तरापर्यंत झेप घेणारी एका शून्यातील हिरॉईन म्हणजे श्रद्धा पाटील.

सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील श्रद्धा कृष्णा पाटील (सध्या रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, मूळ गाव सावर्डे, ता.शाहूवाडी) हिने बॉक्सिंग खेळात राज्यस्तरापर्यंत झेप घेतली आहे. १ ते ३ डिसेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय शासकीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी श्रद्धा पाटील हिची निवड झाली आहे. सध्या ती बॉक्सिंग स्पर्धेसाठी तयारी करत आहे. सावर्डे खुर्द या छोट्याशा गावातून सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून भरारी पूर्व (आर्मी, पोलीस) प्रशिक्षण घेण्यासाठी राजश्री शाहू करिअर अकॅडमी व राजा शिवाजी महाविद्यालय करंजोशी, (ता.शाहूवाडी) येथे ११ वीत प्रवेश घेतला. (Kolhapur News)

प्रशिक्षक प्रा. जयवंत अडसुळ यांनी केले प्रेरित

वडील कृष्णा पाटील सावर्डे खुर्द येथील शेती पाहत शिरोली एमआयडीसीमध्ये काम करतात. तर आई घरकाम करते. राजा शिवाजी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच राष्ट्रीय खेळाडू जयवंत अडसुळ यांनी महाविद्यालयातील व अकॅडमीतील सर्व मुला-मुलींना खेळाचे महत्त्व तसेच विविध भरतीमध्ये खेळाचे होणारे फायदे, खेळामध्ये करियर याची माहिती देऊन विविध खेळाचे प्रशिक्षण सुरू केले. त्यामध्ये बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. शिक्षक जयवंत आडसुळ यांच्या मार्गदर्शनाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन श्रद्धाने बॉक्सिंग खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षक गोरख कदम यांचे सहकार्य

महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळामध्ये मुलींनी व मुलांनी जिल्हास्तरीय व विभागस्तरीय अनेक पदके मिळवली आहेत. त्यामध्ये श्रद्धा पाटील हीची कोल्हापूर शासकीय विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शिक्षक व शाळेचे मार्गदर्शक गोरख कदम यांच्याकडून खेळासाठी लागणारे साहित्य व मार्गदर्शन श्रद्धाला मिळत आहे. यापूर्वी ती कधीही बॉक्सिंग खेळलेली नाही. कॉलेजमध्ये आल्यावर तिला प्रशिक्षण देण्यात आले. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने बॉक्सिंग खेळातील शून्यातील हिरॉईनला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याची आता गरज आहे. (Kolhapur News)

शालेय क्रीडा स्पर्धेसाठी कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत अडसूळ व कॉलेजचे मार्गदर्शक जी. एस. कदम, समीर गुरव, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.

राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन देशाचे व आई-वडिलांचे नाव उज्वल करायचे आहे. आपल्या देशाला ऑलंम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षक जयवंत आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

– श्रद्धा पाटील, बॉक्सिंग खेळाडू

 

श्रध्दाचे पोलीस अथवा आर्मीत भरती होण्याची स्वप्न आहे. बॉक्सिंग खेळातील अनुभव नसताना तिने मारलेली झेप आमच्यासाठी अभिमानाची आहे. घरची परिस्थिती बेताची असली तरी तिच्या करिअरसाठी मागे हटणार नाही.
– कृष्णा पाटील, श्रद्धाचे वडील

हेही वाचा : 

Back to top button