चुकांमधून धडा घेत ‘चांद्रयान-3’ यशस्वी | पुढारी

चुकांमधून धडा घेत ‘चांद्रयान-3’ यशस्वी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करणे ‘इस्रो’समोर मोठे आव्हान होते. चांद्रयान-2 चंद्रावर क्रॅश झालं असलं तरी ते चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं होतं. चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशातून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी चुकांमधून धडा घेऊन चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केली. सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राच्या जमिनीचा अभ्यास हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून चांद्रयान-3ची निर्मिती केली, असे प्रतिपादन ‘इस्रो’ ‘चांद्रयान-3’चे प्रकल्प संचालक शास्त्रज्ञ डॉ. पी. वीरमुथुवेल यांनी शनिवारी केले. हॉटेल सयाजी येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या ‘केएमए कॉन 2023’ परिषदेच्या उद्घाटन समारंभानंतर ‘चांद्रयान-3 आणि त्याचे यश’ या विषयावर ते बोलत होते.

डॉ. पी. वीरमुथुवेल म्हणाले, ‘चांद्रयान-3’चं मॉडेल हे सक्सेस बेस्ड नाही, तर फेल्युअर बेस्ड होते. मागील चांद्रयान हे शेवटच्या काही मिनिटांमध्ये क्रॅश झाले होते. त्यामुळे लँडिंगच्या या फेजसाठी ‘चांद्रयान-3’ मध्ये विशेष काळजी घेण्यात आली. ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या दक्षिण ध—ुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातला पहिला देश ठरला आहे. जगातल्या फक्त चार देशांनी चंद्रावर लँडिंग करण्यात यश आले असून यात भारत, रशिया, अमेरिका, चीन यांचा समावेश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुसज्ज नियोजन आणि ‘चांद्रयान-3’च्या प्रक्षेपणासाठी जुलै महिन्याची निवड करणे ही एक विशेष हालचाल होती. या कालावधीत चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या जवळ येतात. म्हणून ‘इस्रो’ने हा महिना निवडला.

यावेळी डॉ. वीरमुथुवेल यांना ‘केएमए’ अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘फ्लॅश’ नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक केएमएचे अध्यक्ष डॉ. किरण दोशी यांनी केले. ते म्हणाले, कोल्हापूर मेडिकल हब बनले आहे. केएमएतर्फे 1500 हून अधिक मुलींना गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी मोफत लस दिली आहे. वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अर्जुन आडनाईक म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील बदल आत्मसात होण्यासाठी अशा परिषदांचे आयोजन केले जाते.

केएमएचे सचिव डॉ. सूरज पवार, सह अध्यक्ष डॉ. राजेंद्र चिंचणीकर, संघटन सचिव डॉ. विनय चौगुले, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. महावीर मिठारी, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. गौर साईप्रसाद, डॉ. भारती दोशी, डॉ. आशा जाधव आदी उपस्थित होते.

‘लैंगिक समस्या : निदान आणि उपचार’वर आज मार्गदर्शन

वैद्यकीय परिषदेला महाराष्ट्रातून शेकडो डॉक्टरांनी उपस्थिती लावली आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता डॉ. प्रकाश कोठारी हे ‘लैंगिक समस्या : निदान आणि उपचार’ विषयावर परिषदेला संबोधित करणार आहेत. यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. लैंगिक समस्यांबाबत श्रोत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तर देणार आहेत, अशी माहिती असोसिएशनने दिली.

Back to top button