पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार विमानतळ इमारतीचे लोकार्पण | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार विमानतळ इमारतीचे लोकार्पण

उजळाईवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळ टर्मिनस इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. त्याकरिता त्यांना निमंत्रित केले असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. हा समारंभ डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून हा सोहळा भव्य-दिव्य केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर-तिरुपती या मार्गावरील सेवा बंद होऊ देणार नाही.

याउलट अन्य काही नव्या मार्गावर लवकरच सेवा सुरू होईल, असेही त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तिरुपती सेवा बंद होणार याबाबत आपण ऐकले होते. याबाबत संजीव कुमार यांच्याशी चर्चा केली. मात्र, कंपनीने वेळ बदलण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. काहीही झाले तरी ही सेवा बंद करू देणार नाही, असेही महाडिक यांनी सांगितले.

विमानसेवा खंडित होऊ नये यासाठी आयएलएस सिस्टीम बसवण्यात येणार आहे, असे सांगत लवकरच नांदेड, नागपूर, शिर्डी, गोवा या शहरांना जोडणारी विमानसेवा तसेच बंद झालेली अहमदाबाद सेवाही लवकरच सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विमानतळ ते महामार्ग अशा उड्डाणपुलाची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button