जनगणना पुढील वर्षीही रखडणार | पुढारी

जनगणना पुढील वर्षीही रखडणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशाची 16 वी जनगणना गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे. 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे 2024 मध्येही जनगणना रखडण्याची शक्यता असून ती 2025 मध्ये होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशात दर दहा वर्षांनी जनगणना होती. स्वतंत्र भारताची 8 वी आणि देशाची 16 वी जनगणना मार्च 2021 अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. याकरिता 2020 पासून कामही सुरू होते. मात्र, मार्च 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनगणनेचेही काम ठप्प राहिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, त्यानंतर जनगणनेबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. परिणामी, गेल्या तीन वर्षांपासून जनगणनेचे काम रखडलेलेच आहे.

मोबाईल अ‍ॅप तसेच पत्रकांवर माहिती भरणे अशा दोन पद्धतीने जनगणना होईल. पहिल्या टप्प्यात वॉर्ड, विभाग, गाव, शहरनिहाय घरयाद्या तयार करणे आणि घरगणना करण्यात येईल. दुसर्‍या टप्प्यात प्रत्यक्ष माहिती मोबाईल अ‍ॅप व पत्रकांत भरली जाणार आहे. मात्र, हे काम वर्षभर अगोदर सुरू केले जाते. 2023 हे वर्ष संपत आले असून जनगणनेबाबत कोणतीही कार्यवाही राज्यस्तरावर सुरू नसल्याचे तसेच याबाबत कोणत्याही सूचना नसल्याचे सांगण्यात आले.

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मे अखेर निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. यानंतर जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे असतील. यामुळे जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज सप्टेंबरनंतर सुरू होईल. त्यानंतरचा सहा-सात महिन्यांचा अवधी विचारात घेतला तरी प्रत्यक्ष जनगणना करण्यास 2025 वर्ष उजाडेल, अशीच शक्यता आहे. दरम्यान, जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचाही निर्णय अद्याप झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील वर्षीही जनगणना रखडणार, अशीच शक्यता अधिक आहे.

जनगणना डिजिटल स्वरूपात

यावर्षीची जनगणना डिजिटल स्वरूपातील आहे. घरयादी व घरगणना करण्यासाठी प्रगणक, पर्यवेक्षकांसाठी सोपे, सोयीस्कर व अनुकूल मोबाईल अ‍ॅप बनविलेले आहे. ते अँड्रॉईड 4.0 आणि त्यावरील व्हर्जनच्या मोबाईलवर काम करता येणार आहे. यामुळे प्रगणकास क्षेत्रीय कार्य करताना जड पुस्तकांसोबत फिरण्याची गरज नाही. अ‍ॅपमध्ये गणना घरासंबंधी आधीच भरलेला तपशील पुन्हा वापरता येणार आहे. अ‍ॅपमुळे गोषवारा प्रत, सारांश प्रत आणि इतर संबंधित कामांच्या प्रती तयार करण्याचे ओझे कमी होणार

Back to top button