

कोल्हापूर : साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे (वय ६४) यांचे आज (दि.३१) कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, चित्रकार मुलगा रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे. (Raja Shirguppe)
कथा, कविता, नाटक, चित्रपट, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत राजाभाऊंनी आपली अमीट मुद्रा उमटवली. निपाणीतील कामगार चळवळीतून ते समाजकारणात सक्रिय झाले होते. लेखणी ही समाज व्यवस्था बदलासाठी असते, या विवेकाने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीसह प्रगतशील अशा नानाविध चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सांगलीत झालेल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (Raja Shirguppe)
साप्ताहिक साधनाचे लेखक अशीही प्रा. राजा शिरगुप्पे ओळख निर्माण झाली-ती त्यांच्या भटकंतीवर आधारित लेखनामुळे. नानाविध राज्यांमध्ये भटकंती करून त्यांनी केलेले लेखन 'साधना'मध्ये तसेच अन्य नियतकालिकांमधून प्रसिध्द झाले. त्यांची पुस्तकेही निघाली. त्यांची काही पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठीही निवडली गेली. काही पुस्तकांच्या हिंदी भाषेतील आवृत्याही प्रकाशित झाल्या. लहान मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभर त्यांचा मित्रपरिवार आहे. गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे अबालवृद्धांशी त्यांचे मैत्रीचे भावबंध जुळत. त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाली आहे.
हेही वाचा