

कोल्हापूर, प्रवीण मस्के : सीमालढा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे कोल्हापूरशी घट्ट ऋणानुबंध होते. 'शाहू राजाचं कोल्हापूर म्हणजे माझ्या काळजातलं गाव आहे', असे म्हणणार्या अण्णा भाऊंच्या कोल्हापूरबद्दलच्या प्रेमाची प्रचिती त्यांनी विविध ठिकाणी भेट दिलेल्या पाऊलखुणांनी आजही येते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे मूळ गाव वाटेगाव (जि. सांगली) असले, तरी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर 1950 ते 1970 च्या दशकात अण्णा भाऊंनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकवेळा कोल्हापूरला भेट दिली. शाहू-पद्मा टॉकीजच्या समोरून बिंदू चौकाकडे जाणार्या रस्त्यावर चंद्रकांत शेट्ये प्रकाशन संस्था कार्यरत होती. अण्णा भाऊंचे या ठिकाणी कथा-कादंबर्या छापण्याच्या निमित्ताने वारंवार येणे-जाणे होते. वि. स. खांडेकर, चंद्रकांत शेट्ये, चंद्रकुमार नलगे या साहित्यिक मित्रांसमवेतच सत्यशोधक भाई माधवराव बागल ही अण्णा भाऊंच्या गोतावळ्यातील प्रमुख व्यक्तिमत्त्वं होती. तत्कालीन खा. के. एल. मोरे ऊर्फ आप्पासाहेब, हातकणंगले मतदारसंघाचे त्यावेळचे आ. मातंग गुरू, इचलकरंजीचे मातंग नेते किसनराव आवळे या राजकीय धुरिणांबरोबरच डाव्या विचारांचे कॉ. गोविंदपानसरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
महाराष्ट्रात त्यावेळेस अनेक आंदोलने झाली. त्यातील बहुतांश आंदोलने, सभा, मोर्चे हे खासबाग मैदान आणि ऐतिहासिक बिंदू चौकात झाली. यात अण्णा भाऊंचा हिरिरीने सहभाग होता. विविध राज्यांत विखुरलेल्या मराठी भाषिकांचे एकसंध मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावे, यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गतिमान झाली होती. यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. मराठी भाषिकांचा त्याग, समर्पण यातून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, द. ना. गव्हाणकर, शाहीर अमर शेख यांची वाणी, लेखनीचे योगदाने ऐतिहासिक राहिले आहे.
अण्णाभाऊंच्या बहुतांशी कादंबर्यांची सुरुवात कृष्णा, कोयना व पंचगंगेच्या काठावरची आहे. वारणेच्या खोर्यातले सामाजिक, सांस्कृतिक गावगाड्याचे दर्शन, माणसांची ईर्ष्या, वैर, द्वेषभावना प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, निष्ठा या भावभावनांचा आविष्कार अण्णाभाऊंनी आपल्या कथा-कादंबर्यांतून केला आहे. वारणेच्या खोर्यात ही कादंबरी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रति सरकार यावर आधारित होते. त्यावेळेस क्रांती सेनेच्या अनेक बैठका पन्हाळ्याच्या वाघबीळ परिसरात गुप्त पद्धतीने होत. अण्णाभाऊंनी भूमिगत राहून क्रांती सेनेच्या प्रति सरकारला साहाय्य केले. कोल्हापुरातही अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी गुप्त बैठका होत. त्यालाही अण्णाभाऊ उपस्थित असायचे, असे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे तज्ज्ञ सदस्य डॉ. शरद गायकवाड यांनी सांगितले.